मुंबई : शेअर मार्केट (Stock market) सध्या विक्रेते आणि खरेदीदार यांच्यामध्ये अडकल्याचे दिसून येत आहे. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी शेअर बाजारात किंचित तेजी आली आहे. सेन्सेक्स (Sensex) 19 अंकांच्या वाढीसह 54307 वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे निफ्टीमध्ये (Nifty) 11 अंकांची वाढ झाली आहे. निफ्टी 16225 अंकांवर व्यवहार करत आहे. आज निफ्टी आणि सेन्सेक्सवर विक्रीचा दबाव पहायला मिळत आहे. सकाळी शेअर मार्केट सुरू होताच पहिल्या सत्रात सेन्सेक्समध्ये 100 पेक्षा अधिक अंकांची वाढ झाली होती.100 अकांच्या वाढीसह सेन्सेक्स 54400 अंकांवर पोहोचला होता. मात्र त्यानंतर विक्री वाढल्याने सेन्सेक्समध्ये पुन्हा घसरण झाली. आज महिंद्रा अँड महिंद्रा, इंडसंस बँक, रिलायन्स आणि एचडीएफसीच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. तर दुसरीकडे हिंदुस्तान यूनिलिव्हर, टाटा कंसल्टंन्सी सर्व्हिसेस आणि टेक महिंद्राच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.
फूड डिलेव्हरी कंपनी झोमॅटोने मार्च तिमाहीमधील आपला उत्पन्नाचा अहवाल सादर केला आहे. हा अहवाल जाहिर होताच झोमॅटोच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे. झोमॅटोच्या शेअर्समध्ये मंगळवारी सात टक्क्यांची वाढ झाली. सात टक्क्यांच्या वाढीसह हा शेअर 61 रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीने जाहीर केलेल्या मार्च तिमाहीच्या अहवालानुसार झोमॅटोचा तोटा वाढून तो 360 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मार्च 2021 मध्ये कंपनीचा तोटा 134 कोटी रुपये होता. तो मार्च 2022 मध्ये 360 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मात्र दुसरीकडे कंपनीचा महसूल 75 टक्क्यांनी वाढला आहे. मार्च 2021 मध्ये महसूल 692 कोटी रुपये होता. तर चालू वर्षात तो 1212 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
सोमवारी असलेल्या विक्रीच्या दबावानंतर देखील आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मेटल्समध्ये तेजी दिसून येत आहे. मेटल इंडेक्समध्ये एक टक्क्यांची वाढ झाली आहे. टाटा स्टील, जिंदर स्टील, जेएसडब्लू, वेदांता लिमेटेड या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. कंपन्यांच्या शेअर्समध्ये एक टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. सोमवारी मेटल्स क्षेत्राशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये दहा ते पंधरा टक्क्यांची घसरण झाली होती. मात्र आज हे शेअर्स एक टक्क्यांनी वधारले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.