जागतिक भू – राजकीय परिस्थिती तसेच कोरोनामुळे (Corona) शेअर बाजारात (Stock market) पडझड सुरू आहे. सोन्याच्या भावात फारशी वाढ होत नाही. अशावेळी चांदीमध्ये गुंतवणुकीची संधी दिसून येत आहे. मोतीलाल ओसवालच्या अहवालात चांदीत (Silver) तेजी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या 12 महिन्यांत चांदीच्या भावात 30 पट वाढीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जागतिक बाजारात चांदीचे सध्याचे दर 23 डॉलर प्रति औंसच्या जवळपास आहेत, हा दर 30 डॉलरपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. जगभरात ग्रीन टेक्नॉलॉजी आणि स्वच्छ इंधनाची मागणी वाढलीये. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात चांदीची मागणी वाढणार असल्यानं किंमती वाढतील. जगभरात चांदीची सर्वाधिक मागणी औद्योगिक क्षेत्रातच असते. 2021 मध्ये जगभरात 32 हजार 627 टन चांदीची विक्री झाली होती, यापैकी 15 हजार 807 टन चांदीची खरेदी औद्योगिक वापरासाठी करण्यात आली. उर्वरित चांदीचा वापर दागिने, सजावटीच्या वस्तू, भांडी इत्यादीसाठी करण्यात आला, अशी माहिती जागतिक सिल्वर संस्थेच्या सर्वेक्षणात देण्यात आली आहे.
2022 मध्ये चांदीच्या औद्योगिक मागणीत फक्त सहा टक्के वाढीचा अंदाज आहे. याऊलट दागिने आणि इतर कामांसाठी चांदीच्या मागणीत वाढ होण्याचा अंदाज आहे. चांदीच्या भांड्याची मागणी 23 टक्के वाढून 1,639 टन आणि दागिन्याच्या मागणीत 11 टक्के वाढ होऊन मागणी 6,275 टनावर पोहचण्याची शक्यता आहे. ही वाढती मागणीच चांदीच्या भाव वाढीला पूरक ठरणार आहे. भारतात आणि जगभरात चांदीचा वापर दागिने निर्मितीसाठी होतो. चांदीच्या दागिने निर्मितीत भारताचा हिस्सा जवळपास एक तृतीयांश एवढा आहे. तसेच चांदीचे भांडे वापरात भारताचा वाटा 50 टक्के इतका आहे. म्हणजेच भारतातील चांदीच्या मागणीमुळे जागतिक बाजारात यावर्षी चांदीचे भाव वाढू शकतात.
मात्र, या मागणीच्या सूत्रात एक मेखही आहे. चांदीचा सर्वाधिक वापर हा औद्योगिक क्षेत्रात होतो. कोरोनामुळे औद्योगिक क्षेत्राची मागणी कमी झाल्यास दर कमीही होऊ शकतात. म्हणजेच औद्योगिक वापरामध्ये चांदीची मागणी वाढल्यास दर वाढतात, मागणी घटल्यास चांदीचे दर कमी होतात. चीन, जपान आणि अमेरिकेमध्ये दोन तृतियांश चांदीचा वापर औद्योगिक क्षेत्रात होतो. या देशांमध्ये मागणी वाढल्यानंतरच चांदीचे दर वाढू शकतात. चीनमध्ये कोरोनाचा कहर वाढलाय आणि अमेरिकेचा जीडीपी वाढीचा वेग मंदावलाय. जपानसहित संपूर्ण जग महागाईचा सामना करतंय. जोपर्यंत कोरोना आणि महागाईवर नियंत्रणात राहणार नाही तोपर्यंत औद्योगिक क्षेत्रात चांदीची मागणी वाढण्याची शक्यता कमीच आहे. एकूणच कोरोना आणि महागाईवर नियंत्रण ठेवल्यास 2022 मध्ये चांदीची चमक वाढणार आहे. गुंतवणुकीसाठी चांदी हा चांगला पर्याय आहे. भारतीय बाजारात पुढील एक वर्षात चांदीचे दर 70 ते 75 हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती कमोडिटी बाजारातील तज्ज्ञ अनुज गुप्ता यांनी दिली आहे. त्यामुळे आता गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणूक तज्ज्ञाचा सल्ला घेऊन, त्यानुसार चांदीत गुंतवणूक केल्यास फायद्याचे ठरू शकते.