नवी दिल्ली : आता छोट्या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनाही (Employees) भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती योजना आणि विम्याचा (Insurance) लाभ मिळेल. कंपन्यांना यामध्ये त्यांचा वाटा देता येणार आहे. इकोनॉमिक्स टाईम्सने याविषयीचा अहवाल दिला आहे. त्यानुसार, केंद्र सरकार (Central Government) त्यासाठी लवकरच नियमांमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. यामुळे अगदी 10 कर्मचारी संख्या असलेल्या कंपनीतील कामगारांनाही लाभ मिळणार आहे.
सध्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) यासाठी वेगवेगळं योगदान देण्यात येते. नवीन नियमाचा फायदा लघु उद्योग समुहातील कंपन्यांना होईल. त्यांना हिस्सा देताना किचकट प्रक्रिया सोपी करण्याची तयारी करण्यात येत आहे.
या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी तज्ज्ञांच्या पॅनलसमोर ठेवण्यात येणार आहे. मीडिया अहवालानुसार ,प्रस्तावात 10 ते 20 कर्मचारी संख्या असलेल्या कंपन्या, लघु उद्योगांचा समावेश करण्यात येईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती योजना आणि विम्याचा लाभ मिळेल.
सुरुवातीच्या टप्प्यात EPFO आणि ESIC स्तरावर चर्चेची फेरी करण्यात येईल. त्यानंतर या छोट्या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी तज्ज्ञांची एक समिती गठित करण्यात येणार आहे. कामगार मंत्रालय यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करेल.
सामाजिक सुरक्षा संहिता, 2020 नुसार, केंद्र सरकार विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा परीघ वाढविण्यावर जोर देत आहे. त्यासाठी नवीन योजना आणण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कामगारांना, कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ घेता येईल.
केंद्र सरकार त्यासाठी अधिसूचना काढू शकते. त्यानंतर कंपन्यांना यासंबंधीची परवानगी देण्यात येईल. सध्या कंपन्या ESIC फंडामध्ये पगाराच्या 3.25 वाटा देतात. तर कर्मचारी वेतनाच्या 0.75 टक्के हिस्सा देतात.
सध्या 10 वा जास्त कर्मचारी संख्या असलेल्या संस्था, कंपन्यामध्ये विम्यासाठी ESIC योजनेतंर्गत हिस्सा जमा करण्यात येतो. तर 20 वा जास्त कर्मचाऱ्यांची संख्या असलेल्या कंपन्या भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती योजना आणि विम्याचा हिस्सा देतात.