ठाणे शहरातील मालमत्ताधारकांसाठी ठाणे महापालिकेने (Thane Municipal Corporation) विशेष योजना आणली आहे. त्यांच्यासाठी खास कर सवलत (Tax Benefit) देण्यात येणार आहे. या आर्थिक वर्षाचा संपूर्ण कर भरणा-या नागरिकांसाठी ही योजना आहे. करदात्यांनी 2022-23 या आर्थिक वर्षाचा (Fiscal Year) मालमत्ता कर भरणा-या करदात्यांना खास सवलत मिळेल. पण ही योजना आणि सवलत मिळवण्यासाठी नागरिकांना पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुस-या सहामाहीच्या मालमत्ताचा कर एकाचवेळी भरावा लागेल. दोन्ही देयकांची ही रक्कम करदात्यांना (Tax payers) येत्या 15 जुलैपर्यंत जमा करावी लागणार आहे. तरच त्यांना 10 टक्के सवलतीचा (10% Tax exemption) फायदा देण्यात येईल. विशेष म्हणजे करदात्यांना कोणत्याही कर संकलन केंद्रावर अगदी सुट्टीच्या दिवशी ही कर भरण्याची सोय करुन देण्यात आली आहे. करदात्यांना या ठिकाणी रोखीत, धनादेश, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड याद्वारे कर भरणा करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
या योजनेला ठाणे शहरातील मालमत्ताधारकांनी चांगला प्रतिसाद दिला. मालमत्ता करात 10 टक्के सवलत मिळत असल्याने ही संधी ठाणेकरांनी चुकवली नाही. परंतू ही योजना अगदी काही दिवसांसाठी होती. त्यामुळे नागरिकांनी महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांच्याकडे योजनेला मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. त्यानुसार, कर सवलत देण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता जे नागरिक येत्या 15 जुलैपर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या सहामाहीतील कर देयकांचा भरणा करणार आहेत. त्यांना कराच्या रकमेत 10 टक्के सवलत देण्यात येणार आहे. 16 जुलैपासून ते 15 ऑगस्टपर्यंत मालमत्ता कराचा भरणा करणाऱ्या मालमत्ताधारकांना 3 टक्के, 16 ते 31 ऑगस्ट दरम्यान मालमत्ता कर जमा जमा केल्यास 2 टक्के सवलत देण्यात येणार आहे.
ठाणेकरांना कर भरण्यासाठी पालिकेच्या कोणत्याही प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील कोणत्याही कर संकलन केंद्रावर कर भरता येईल. रोख, धनादेश, धनाकर्ष तसेच डेबीट कम एटीएम कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेचार या वेळेत नागरिकांना कर जमा करता येईल. दरम्यान, करदात्यांना सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कर भरता येणे शक्य व्हावे, याकरिता प्रभाग कार्यालयाकडील संकलन केंद्रे या कालावधीत प्रत्येक शनिवारी सकाळी साडेदहा ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू राहणार आहेत. या काळात नागरिकांना ही कर सवलत मिळणार आहे. त्यानंतर ही कर सवलत योजना सुरु राहणार असली तरी करदात्यांना दहा टक्के कर सवलत मिळणार नाही.