मुंबई | 4 डिसेंबर 2023 : जगभरातील बड्या आयटी कंपन्यामधून कामगारांची कपात करण्याचे प्रकार सुरुच आहेत. आता प्रसिध्द ऑनलाईन म्युझिक स्ट्रीमिंग सर्व्हीस प्रोवायडर कंपनी स्पॉटिफाय ( spotify ) वाढता खर्च कमी करण्यासाठी जगभरातील 1500 कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचा वाढता तोटा कमी करुन तिला फायद्यात आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे कंपनीने म्हटले आहे. स्पॉटिफायची या वर्षातील तिसरी कामगार कपात आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात कंपनीने सहा टक्के कर्मचाऱ्यांना आणि जूनमध्ये दोन टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले होते.
गुगल आणि इतर आयटी कंपन्यांनी कोरोनानंतर आपल्या कामगारांना नोकरीवरून काढले होते. आता स्पॉटिफाय कंपनीचे चीफ एक्झुकेटिव्ह ऑफीसर डॅनियल इक यांनी सोमवारी कंपनीच्या ब्लॉगवर 17 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्याची घोषणा केली आहे. नोकऱ्यांमधील ही कपात धोरणांतर्गत केली जात आहे. कमी मनुष्यबळात जास्त फायदा मिळविण्याचे यामागे धोरण आहे.
कंपनीचे चीफ एक्झुकेटिव्ह ऑफीसर डॅनियल यांनी आपल्या पोस्टमध्ये कंपनीतून काढणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सांगितलेली नाही. परंतू कंपनीच्या एका प्रवक्त्याने जगभरातून 1500 कर्मचाऱ्यांना हटविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. स्टॉकहोम स्थित कंपनीने साल 2023 मध्ये सप्टेंबरपर्यंत सुमारे 50 कोटी डॉलरचा ( 4168 कोटी ) तोटा झाल्याचे म्हटले आहे.
स्पॉटिफायने कोविड-19 साथीत दरम्यान कर्मचारी, कंटेट आणि मार्केटींगवर 2020 आणि 2021 मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. परंतू यासाठी कंपनीने स्वस्तात कर्ज घेतले होते. परंतू नंतर व्याजदरात वाढ झाल्याने कंपनीची अडचण वाढली.
गेल्यावर्षी जगभरातील केंद्रीय बॅंकांनी व्याजदर वाढविणे सुरु केले. आता आम्ही खूप अडचणीत आहोत. गेल्या एक वर्षांत खर्च कमी करण्याचे अनेक प्रयत्न केल्यानंतरही आम्हाला कॉस्ट स्ट्रक्चरवर खास लक्ष पुरवावे लागत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कोरोनाकाळात आपला व्यवसाय विस्तार करणाऱ्या अनेक टेक्नॉलॉजी कंपन्यांनी यावर्षी हजारो कामगारांना कामावरुन काढले आहे. यात ॲमेझॉन, गुगुल, मायक्रोसॉफ्ट, मेटा आणि आयबीएमचा समावेश आहे.