नवी दिल्ली | 22 ऑगस्ट 2023 : भारतीय महिला (Indian Women) देशातील प्रत्येक क्षेत्रात नावारुपाला येत आहेत. राजकारणच नाही तर प्रशासन, लष्कर, क्रीडा, इतर सेवा यासह उद्योग, व्यवसायात पण त्यांनी नाव कमावले आहे. भारतात काही वर्षांपासून स्टार्टअप आणि युनिकॉर्नचे वारे वाहत आहेत. अनेक जण फंड जमा करुन व्यवसायाची उभारणी करतात. एखादे उत्पादन बाजारात उतरवितात. त्यासाठी अत्याधुनिक आयुधांचा वापर करतात. स्टार्टअप कंपनी नंतर युनिकॉर्न होते. जगभरात तिची उत्पादनं विक्री होतात. त्यातून मोठी कमाई होते. भारतात अशा स्टार्टअपची मोठी वाढ झाली आहे. अनेक तरुण उद्योजक यामध्ये उतरले आहेत. आता महिला उद्योजक पण यामध्ये मागे नाहीत. भारतात या महिलेने (Women Entrepreneur) असाच काहीसा करिष्मा करुन दाखवला. वयाच्या 50 व्या वर्षी तिने वेगळा वाट चोखंदळली आणि त्या वाटेवर ती यशस्वी सुद्धा झाली. कोण आहे ही उद्योजिका महिला, काय आहे तिचा संघर्ष?
Nykaa च्या सर्वेसर्वा
ही गोष्ट आहे नायका या ब्रँडच्या सर्वेसर्वा फाल्गुनी नायर यांची. त्या या कंपनीच्या एक्झिक्युटिव्ह चेअरपर्सन, एमडी आणि सीईओ आहेत. कॉस्मेटिक्स सेक्टरमध्ये त्यांची कंपनी ‘Nykaa’ ही फायर ब्रँड आहे. ती सौंदर्य प्रसाधन क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. ही कंपनी टाटा ग्रुपची कॉस्मेटिक ई-रेटलिंग ‘टाटा क्लिक’ आणि मुकेश अंबानी यांच्या ‘टिरा’ या ब्युटी ब्रँडला टक्कर देत आहे.
सर्वात श्रीमंत महिला CEO
फोर्ब्स च्या रिअल टाईम श्रीमंत यादीत भारताच्या 13 महिला अब्जाधीश आहेत. त्यात फाल्गुनी नायर यांचे नाव आहे. कंपनीबाबतचा कोणताही निर्णय घेण्यात त्यांची थेट भूमिका असते. त्या एकमेव अशा महिला सीईओ आहेत. त्या देशातील सर्वाधिक श्रीमंत महिला सीईओ आहे. त्यांची नेटवर्थ 2.5 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 20,700 कोटी रुपये आहे.
50 व्या वर्षी सुरु केला व्यवसाय
फाल्गुनी नायर या तरुण वयात काही व्यवसायात उतरल्या नाहीत. त्यांनी IIM अहमदाबाद येथून शिक्षण पूर्ण केले. बँकिंग गुंतवणूक आणि ब्रोकिंग सेक्टरमध्ये 20 वर्षे काम केले. त्यानंतर ज्या वयात अनेक जणांना निवृत्तीची स्वप्न पडतात. त्याच वयात, त्यांनी स्वतंत्र व्यवसायाचे स्वप्न साकार केले. वयाच्या 50 व्या वर्षी त्यांनी Nykaa ची सुरुवात केली. आता त्या साठीत पोहचल्या आहेत. त्या भारतातील सर्वात यशस्वी व्यावसायिक महिलांपैकी एक आहे.
देशभरात नायकाचा डंका
फाल्गुनी नायर यांचा नायका ब्रँड कॉस्मेटिक्सची ई-रिटेलिंग करते. हा ब्रँड केवळ ई-कॉमर्स संकेतस्थळापर्यंत मर्यादीत नाही. हा ब्रँड जवळपास 35,000 उत्पादने तयार करतो. या कंपनीने सिनेअभिनेत्री, लोकप्रिय माणसं यांच्यासह जवळपास 800 क्यूरेटेड ब्रँड तयार केला आहे. ही कंपनी देशभरात 17 स्टोअर पण चालवते.