मुंबई : भारतीय शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरूच आहे, शेअर बाजारावर (Stock Market) विक्रीचा दबाव दिसून येत आहे. आज शेअर बाजार सुरू होताच पुन्हा एकदा सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीमध्ये (Nifty) मोठी घसरण पहायला मिळाली. सेन्सक्स तब्बल 950 अंकानी घसरला असून, निफ्टी 16 हजारांच्या खाली घसरला आहे. गुंतवणूकदारांनी शेअर्स विक्रीचा धडाका लावल्याने गेल्या आठवड्यापासून सातत्याने शेअर बाजारात पडझड सुरू आहे. बँक, ऑटो फार्मा, मेटल एफएमसीजी अशा सर्वच क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत सेन्सेक्स 1.81 टक्क्यांच्या घसरणीसह 53,107 अकांवर घसरला आहे. तर दुसरीकडे निफ्टीमध्ये देखील मोठी घसरण पहायला मिळत असून, निफ्टीमध्ये 290 अकांची घसरण झाली आहे. 30 शेअर पैकी 29 शेअर्सनी धोक्याची पातळी गाठली आहे. यामध्ये एचडीएफसी बँक, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक बजाज फायनान्स, कोटक महिंद्र बँक, इन्फोसीस, आयटीसी या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे.
गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस चांगला राहिला नाही. शेअर बाजारावर विक्रीचा दबाव वाढल्याने विविध कंपन्यांचे शेअर्स कोसळत आहेत. आज गुंतवणूकदारांचे थोडथिडके नव्हे तर तब्बल 5 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. बुधवारी बीएसई लिस्टेड कंपन्यांची एकूण मर्केट कॅप 2,46,31,990.38 कोटी रुपये होती. तिच्यामध्ये 4,69,141.36 कोटी रुपयांची घसरण झाली असून, सध्या बीएसई लिस्टेड कंपन्यांनी मार्केट कॅप 2,41,62,849.02 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या आठवड्यापासून शेअर बाजारात घसरणीचे सत्र कायम असून, गुंतवणूकदारांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. गेल्या महिन्याभरात गुंतवणूकदारांना तब्बल 33 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. गेल्या महिन्याभरात सेन्सेक्स जवळपास आठ टक्क्यांनी घसरला आहे.
गेल्या दोन दिवसापासून डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये तेजी दिसून येत होती. मात्र आज या तेजीला ब्रेग लागला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये 30 पैशांची घसरण झाली असून, रुपया प्रति डॉलर 77.55 वर पोहोचला आहे. बुधवारी रुपयामध्ये 9 पैशांची तेजी आली होती. मात्र गुरुवारी पुन्हा एकदा रुपया घसरला असून, त्यामध्ये तीस पैशांची घसरण झाली आहे. रुपयांमध्ये घसरण होत असून, देशात महागाई वाढतच आहे. वाढत्या महागाईला आळा घालण्याचे मोठे आवाहन केंद्र सरकार पुढे असणार आहे.