शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा झटका दिला. BSE Sensex 930 अंकांनी आपटला. सेन्सेक्स 80,220 अंकावर आला. तर निफ्टी 50 इंडेक्समध्ये 310 अंकांची घसरण झाली. निफ्टी 24,472 अंकावर बंद झाला. तर निफ्टी बँक 700 अंकांनी घसरला. बीएसई सेन्सेक्सचे टॉप 30 शेअरमध्ये आज ICICI बँकचा शेअर एकदम उसळी घेतली. तर इतर सर्व 29 शेअर रेड अलर्टवर व्यापार करत होते. महिंद्री अँड महिंद्राच्या शेअरमध्ये 3.29 टक्क्यांची घसरण आली. आजचा मंगळवार ग्राहकांसाठी अमंगळ ठरला. आज बाजारात गुंतवणूकदारांचे 8.51 लाख कोटी पाण्यात गेले.
शेअरमध्ये मोठी घसरण
JSW Steel, बजाज फायनान्स, एल अँड टी, मारुती सुझुकी, इंडसईंड बँक, टाटा मोटर्स, एसबीआय सारख्या शेअरमध्ये जवळपास 3 टक्क्यांपर्यंत घसरण दिसली. NSE च्या 2,825 शेअरमध्ये 299 स्टॉकने उसळी घेतली. तर 2,466 शेअरमध्ये मोठी घसरण झाली. 60 शेअरमध्ये कोणताचा बदल झाला नाही. तर 48 शेअर्संनी नवीन विक्रमाला गवसणी घातली. तर 150 शेअर्स 52 आठवड्यातील सर्वात निच्चांकावर पोहचले. 49 शेअर अप्पर सर्किट आणि 309 शेअर लोअर सर्किटवर आले.
या सेक्टरमध्ये सर्वात मोठी घसरण
आज निफ्टी बँकेपासून ते आरोग्य क्षेत्रातील स्टॉकमध्ये मोठी घसरण दिसली. पीएसयू बँकेच्या शेअरमध्ये 4.47 टक्क्यांपर्यंत घसरण आली. स्मॉलकॅप आणि मिडकॅपमध्ये मोठी घसरण दिसली. बीएसई स्मॉलकॅप 2,186.12 अंकाने कोसळला. तर BSE Midcap मध्ये 1,214.83 अंकांची घसरण दिसली.
परदेशी पाहुण्यांचे विक्री सत्र
परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात मोठा खेला केला. ऑक्टोबर महिन्यात या परदेशी पाहुण्यांनी भारतीय शेअर बाजारातून विक्रमी 82,479 कोटी रुपये काढून घेतले. मार्च 2020 च्या सुरुवातीला परदेशी गुंतवणूकदारांनी 65,816 कोटी रुपये काढले होते. त्यावेळी भारतीय गुंतवणूकदारांनी मोठा खड्डा भरला होता. आता परदेशी पाहुण्यांनी चीनकडे मोर्चा वळवल्याने भारतीय शेअर बाजारात त्सुनामी आली आहे.
जागतिक बाजारात स्थिती काय?
जागतिक बाजारात सध्या नरमाईचे संकेत आहेत. अमेरिकन बाजारात सोमवारी तीन प्रमुख निर्देशांकांपैकी केवळ एकच तेजीत दिसला. तर जपान आणि दक्षिण कोरियासारख्या आशियाई बाजारांत 1 टक्क्यांहून अधिकची घसरण दिसली. चीन आणि हाँगकॉगच्या बाजाराने मात्र उलट प्रतिक्रिया नोंदवली. येथील शेअर बाजारात तेजीचे सत्र दिसून आले.