गेल्या तीन दिवसांपासून भारतीय शेअर बाजाराची दमदार घौडदौड सुरु आहे. गुरुवारी पण बाजाराने पुन्हा मोठी झेप घेतली. BSE Sensex ने 80,000 अंकाचा आकडा पार केला. तर NSE Nifty ने त्याच सर्वकालीन उच्चांक गाठला. एका महिन्यापूर्वी याच तारखेला, 4 जून 2024 रोजी बाजारात त्सुनामी आली होती. त्या दिवशी गुंतवणूकदारांचे जवळपास 30 लाख कोटी रुपये बुडाले होते. जाणून घ्या एका महिन्यात शेअर बाजारात काय काय बदल झाले आणि कशी नुकसान भरपाई झाली?
4 जून रोजी शेअर बाजारात काय झाले होते?
सर्वात अगोदर 4 जून 2024 रोजी बाजारात काय झाले ते जाणून घेऊयात. लोकसभा निवडणूक 2024 झाल्यानंतर याच दिवशी निकाल जाहीर झाले होते. एक्झिट पोलमध्ये वर्तवले अंदाज धराशायी झाले. त्याचा परिणाम बाजारात दिसून आला. बाजारात गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला.
निवडणूक निकाला दिवशी शेअर बाजारात व्यापारी सत्र सुरु होताच घसरणीचे सत्र सुरु झाले. त्याला लवकर ब्रेक लागलाच नाही. बीएसई 30 शेअरचा सेन्सेक्स त्या दिवशी 1700 अंकांनी आपटला. दुपारी 12:30 वाजता तर कहर झाला, सेन्सेक्स 6094 अंकांनी आपटला.तो 70,374 अंकांच्या स्तरावर आला.
सेन्सेक्सच नाही तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी-50 जवळपास 1947 अंकांनी आपटला. निफ्टी 21,316 अंकांच्या स्तरावर आला. कोरोना काळानंतर पहिल्यांदा शेअर बाजारात मोठी घसरण दिसली. स्टॉक बाजार क्रॅश झाला. बीएसईचे मार्केट कॅप एकाच दिवसात जवळपास 30 लाख कोटी रुपयांनी कमी झाले.
80,000 पेक्षा मोठी उडी
तर एका महिन्यानंतर त्याच तारखेला, 4 जुलै,2024 रोजी शेअर बाजारात बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी दोन्ही इंडेक्स त्याच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहचले. रॉकेटच्या गतीने भरपाई झाली. सेन्सेक्स 80,000 चा आकडा पार केला. महिन्याभरात सेन्सेक्सने जवळपास 10,000 अंकांची रिकव्हरी झाली, हा एक इतिहास घडला. तर निफ्टीतही या कालावधीत मोठी तेजी पाहायला मिळाली. सध्या दोन्ही निर्देशांक दिवसागणिक नवीन विक्रम गाठत आहेत. या महिन्याच्या अखेरीस मोदी सरकारचे केंद्रीय बजेट सादर होणार आहे. त्यामुळे बाजारात पुन्हा तेजी येईल, असा विश्वास गुंतवणूकदारांना वाटत आहे.