मुंबई : कोळशाला (Coal) काळा हिरा म्हटलं जातं. भारतात या काळ्या हिऱ्याच्या व्यापारावर कोल इंडियाचा (Coal India) एकाधिकार आहे. असे असूनही कोल इंडियाच्या शेअर्सची कामगिरी नेहमीच चकमा देणारी ठरलीये. एकाधिकारशाही असणारा व्यवसाय, मजबूत पाया, विस्ताराचे योग्य नियोजन असूनही कोल इंडियाचा शेअर्स (Stock) गेल्या काही वर्षांपासून घसरत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोल इंडियाचा शेअर्स चांगली कामगिरी करताना दिसतोय. त्यामुळे कोल इंडियाचे अच्छे दिन आले का ? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतोय. आता कोल इंडियाच्या व्यवसायावर एक नजर टाकूयात.178 बिलियन टन संसाधन, 54 बिलियन टन साठा असणारी कोल इंडिया संपूर्ण जगातील सर्वात मोठी कोळसा उत्पादन करणारी कंपनी आहे 2022 या आर्थिक वर्षातील देशांतर्गत कोल उत्पादनात जवळपास 80 टक्के हिस्सा हा कोल इंडियाचा आहे म्हणजेच कोल इंडियाची एकाधिकारशाही आहे.
एवढं मजबूत फंडामेंटल कोल इंडियाचं असल्यामुळे बहुतांश ब्रोकर्सलासुद्धा शेअर्सवर विश्वास आहे. तसेच इश्यू प्राईसपेक्षा शेअर्स वर जाण्याची शक्यताही ब्रोकर्सना वाटतेय. कोणत्या कारणांमुळे कोल इंडियाचा शेअर्स इश्यू प्राईसपेक्षा वर जाईल हा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल. कोळशाच्या वाढलेल्या आंतरराष्ट्रीय किंमती, कमी आयातीमुळे ई-लिलावात प्रीमियममध्ये झालेली वाढ,तसेच 2022 या आर्थिक वर्षातील चवथ्या त्रैमासिकात ई-लिलावाच्या प्रीमियममध्ये 65 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचे सकारात्माक संकेत आहेत. याव्यतिरिक्त 2022 मध्ये जास्त मागणीमुळे कोळसा उत्पादन 4.4 टक्क्यांनी वाढून 623 मिलियन टन आणि पुरवठा 15 टक्क्यांनी वाढून 662 मिलियन टन झालाय. उत्पादन आणि पुरवठा हा सर्वाधिक आहे. 2023 या आर्थिक वर्षात कंपनीनं 700 मिलियन टन कोळसा उत्पादन आणि पुरवठा करण्याचं लक्ष्य ठेवलंय ऊर्जा क्षेत्राचं भविष्य देखील चांगलं आहे. भारतात जवळपास 51 टक्के वीज उत्पादन औष्णिक प्रकल्पाद्वारे करण्यात येते. वीज क्षेत्राची 80 टक्के गरज कोळशामार्फत पूर्ण होते. 2022-30 च्या दरम्यान देशात विजेची मागणीत 6 ते 8 टक्के वाढण्याची शक्यता आहे. यामुळे 2019 पासून 2030 पर्यंत कोळशाची मागणी 1,113 मिलियन टनाने वाढून 1,500 मिलियन टन होण्याची शक्यता आहे.
एकूणच काळ्या हिऱ्याच्या व्यवसायातील असणारी कोल इंडियाच्या शेअर्सची कामगिरी भविष्यात दमदार असणार आहे. दीर्घकाळासाठी तुम्ही कोल इंडियाच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असताल तर प्रत्येक घसरणीच्या वेळी थोडे थोडे शेअर्स खरेदी करा. मात्र, कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याअगोदर तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.