मुंबई : जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतामुळे आज भारतीय शेअर बाजारात (Stock Market) तेजी दिसून येत आहे. शेअर बाजार सुरू होताच पहिल्याच सत्रात सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) हिरव्या निशाणावर पोहोचले. पहिल्याच सत्रात सेन्सेक्स 200 अंकांनी वधारला. तर निफ्टीने देखील 16,600 अकांचा टप्पा पार केला. आज जवळपास सर्वच क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. गुंतवणूक वाढल्याने शेअर मार्केटमध्ये तेजी आली. आज बँक आणि एफएमसीजी क्षेत्राशी संबंधित शेअरच्या मूल्यात वाढ झाली आहे. एशियन पेंट्स, एनटीपीसी, टाटा स्टील, एचयूएल, मारुती सुझुकी, आयटीसी, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, एम अँण्ड एम यांचे शेअर्स आज टॉप गेनर्स राहिले. तर डॉ. रेड्डीज, विप्रो, सन फार्मा, पावरग्रिड, इन्फोसिस या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी पडझड दिसून आली.
आज लार्ज कॅप सोबतच मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये देखील तेजी दिसून आली. मिड कॅप इंडेक्समध्ये 0.28 टक्क्यांची वाढ झाली. तर बीएसई स्मॉल कॅपचा इंडेक्स 0.89 टक्क्यांनी वाढला. आज शेअर बाजार सुरू होताच पहिल्याच सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी वधारल्याने गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. मे महिन्याचा आढावा घ्यायचा झाल्यास मे महिना हा गुंतवणूकदारांसाठी म्हणावा इतका चांगला ठरला नाही. काही दिवसांचे अपवाद वगळता महिनाभर शेअर मार्केटमध्ये पडझड सुरू होती. मात्र आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी शेअर मार्केट वधारल्याने गुंतवणूकदारांनी समाधान व्यक्त केले आहे.
आज भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे अमेरिकन शेअर बाजारात पडझड झाली आहे. अमेरिकन शेअर बाजार गेले सहा दिवस सलग तेजीत होता. मात्र मंगळवारी झालेल्या पडझडीने या तेजीला ब्रेक लावला. डाओ जोंस 222 अंकाच्या घसरणीसह मंगळवारी बंद झाला. डाओमध्ये 0.67 टक्क्यांची घसरण झाली. तर एस अँण्ड पीमध्ये देखील 500 अकांची घसरण झाली. एस अँण्ड पी 0.63 टक्क्यांनी घसरला. नेस्डॅकमध्ये देखील घसरण दिसून आली. अमेकिकेप्रमाणेच युरोपीयन बाजारातसुद्धा घसरण पहायला मिळत आहे.