मुंबई : शेअर बाजारातील (Stock Market) गुंतवणूकदारांसाठी (Investors) दिलासादायक बातमी आहे. जागतिक बाजारात घडत असलेल्या सकारात्मक घडामोडींचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारात देखील दिसून येत आहे. सलग आठवडाभर शेअर बाजार पहिल्या सत्रात कोसळत होता. मात्र आज चित्र वेगळ असून, शेअर बाजारात सुधारणा झाल्याचे पहायला मिळत आहे. आज शेअर बाजार सुरू होताच पहिल्याच सत्रात सेन्सक्सने (Sensex) 650 अकांची उसळी घेतली आहे. तसेच निफ्टीमध्ये देखील मोठी वाढ पहायला मिळत असून, निफ्टीने आज 16 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. बाजारावरील विक्रीचा दबाव कमी झाला असून, खरेदीदारांमध्ये वाढ झाली आहे. सध्या बँक, ऑटो, एफएमसीजी, मेटल, आयटी यांच्यासोबत आज सर्वच क्षेत्रातील कंपन्या या हिरव्या निशाणावर कारभार करत आहेत. आज बीएसई लिस्टेड 30 पैकी 22 शेअर्समध्ये तेजीचे वातावरण आहे. बऱ्याच दिवसांनी शेअर बाजारात तेजी दिसत असल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.
शेअर बाजारात गेल्या आठवडाभरापासून मंदीचे वातावरण होते, गेल्या शुक्रवारी शेअर बाजार तब्बल आठशे अंकांच्या घसरणीसह बंद झाला होता. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी स्थिती कायम राहिली. सोमवारी पहिल्या सत्रात मोठी पडझड दिसून येत होती. मात्र त्यानंतर शेअर बाजार या पडझडीतून सावरला. तरी देखील 164 अकांच्या घसरणीसह बंद झाला. मंगळवार आणि बुधवारी देखील सेन्सेक्स कोसळला होता. गुरुवारी सेन्सेक्समध्ये 1,158 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्स 1,158 अंकाच्या घसरणीसह बंद झाला. मात्र आज काल झालेल्या घसरणीला मागे टाकत सेन्सेक्सने उसळी घेतल्याने गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र आठवडाभराची स्थिती पहाता आजूनही गुंतवणूकदारांच्या मनात धाकधूक कायम आहे.
आज रुपयामध्ये देखील सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. रुपयाचे मुल्य डॉलरच्या तुलनेत आठ पैशांनी वाढले. गुरुवारी रुपयाच्या मुल्यात डॉलरच्या तुलनेत तीस पैशांची घसरण झाली होती. आज रुपयामध्ये सुधारणा झाल्याने त्याचा सकारात्मक परिणाम हा शेअर मार्केटमध्ये दिसून येत आहे. दरम्यान आठवडाभरापासून सूरू असलेल्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले असून, कोट्यावधी रुपये बुडाले आहेत.