पुणे | 29 ऑक्टोबर 2023 : माणसाकडे येणाऱ्या संकटावर मात करण्याची जिद्द हवी, तरच त्याला संकटातही मार्ग सापड शकतो. पुण्याच्या तळेगावात रहाणाऱ्या गौतम राठोड यांच्यावर देखील संकट आले, त्यांना कॅन्सर झाला परंतू ते डगमगले नाहीत. त्यांच्या डाव्या किडनीला कॅन्सरचा ट्युमर आल्याने त्यांची किडनी काढावी लागली. त्यातूनही ते बाहेर पडले आणि एरव्ही केवळ काश्मीरात बहरणारे आणि अत्यंत महागडे असलेले केसर त्यांनी आधुनिक एरोपोनिक पद्धतीने घरच्या घरीच फुलविले आणि चांगला फायदा कमावला आहे.
बी.कॉम झाल्यानंतर गौतम राठोड यांनी तळेगावातील एका गॅरेजमध्ये गाडी दुरुस्तीचा व्यवसाय सुरु केला. सुरुवातीला हा धंदा खुप चालला. जीवन अत्यंत आनंदात सुरु होते. परंतू नियतीच्या मनात काही वेगळेच होते. त्यांना कॅन्सर झाला. त्यांच्या डाव्या किडनीत गाठ आल्याने त्यांची किडनी काढावी लागली. यातून ते अखेर सावरले. परंतू डॉक्टरांनी जास्त मेहनत घेण्यास मनाई केल्याने त्यांना पोटापाण्यासाठी नवीन व्यवसायाचा शोध सुरु केला. याच वेळी त्यांच्या एका मित्रांनी केसर शेतीचा एक व्हिडीओ त्यांना पाठविला. या व्हिडीओला पाहून त्यांना आपल्या नव्या व्यवसायाची कल्पना सूचली आणि त्यांचे भविष्यच बदलले. त्यांनी एरोपोनिक तंत्राने शेती करण्याचा निर्णय केला. त्यांनी कश्मीरातील केसरची पुण्यातील तळेगाव-दाभाडे येथे शेती करायला सुरुवात केली. त्यांचा केसर शेतीला यश आले.
व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांची उत्सुकता वाढली. त्यांनी केसर शेतीचा अभ्यास केला. त्यांनी एका बंद खोलीत केसर लावण्याचा प्रयोग केला. त्यांनी इमारतीच्या छतावरचा हा प्रयोग केला. दहा बाय बाराच्या खोलीत वर्टीकल फार्मिंगच्या मदतीन केसरसाठी पोषक वातावरण तयार केले. कश्मीरातून केसरच्या बिया आणल्या. त्याला आवश्यक प्रकाश आणि हवा दिली. त्यानंतर तीन महिन्यात केसरची जांभळ्या रंगाची सुंदर फुले उगविली. गौतम राठोड यांच्याकडे चांगल्या गुणवत्तेचे केसर उगवू लागले.
तीन महिन्यानंतर ऑक्टोबरच्या महिन्यात गौतम राठोड यांनी केसरचे पिक कापले. केसर अत्यंत महागडे असून 12 ते 13 मिमी लांबीचे केसरची किंमत 800 रुपये ग्रॅम आहे. तुकडा केसरची किंमत 400 रुपये प्रति ग्राम आहे. गौतम यांनी या गुणवत्ता असलेल्या केसर विक्रीचे लायसन्स मिळविले असून आता बाजारपेठेत हे केसर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्याचा निर्णय घेतला आहे.