नवी दिल्ली | 17 ऑगस्ट 2023 : तुम्ही दिवाळीला बोनस म्हणून आपल्या कर्मचाऱ्यांना चक्क कार आणि फ्लॅट देणाऱ्या उद्योजकाबद्दल नक्कीच ऐकले असेल. परंतू सूरत येथील या अनोख्या उद्योजकाची सुरुवात मात्र अत्यंत गरीबीतून झाली होती. केवळ 12 रुपयांत आपल्या करीयरची सुरुवात करणाऱ्या आणि शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या या उद्योजकाची माहीती तुम्हाला त्यांच्या बोनसमुळे झाली असेलच. आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून चक्क मर्सिडीज कार वाटणाऱ्या या अनोख्या दिलदार उद्योजकाची कहानी तुम्ही वाचणार आहात.
गुजरातच्या मरेली जिल्ह्यातील डुढाला गावाचे सावजीभाई ढोलकीया अख्ख्या जगात सर्वात जास्त बोनस दिल्यामुळे चर्चेत आले आहेत. चौथीपर्यंत शिकलेले सावजीभाई 1977 मध्ये आपल्या गावातून केवळ 12.5 रुपये घेऊन सुरतला निघाले होते. हे पैसे तर बसच्या भाड्यातच संपले. त्यांनी बिकट परिस्थितीतून वाट काढीत 1.5 अब्ज डॉलरचे ( 12 हजार कोटी रुपये) साम्राज्य उभे केले आहे.
डायमंड नगरी सुरत येथील डायमंड व्यापारी सावजीभाई यांचा व्यापार इतका वाढला आहे की त्यांना कर्मचाऱ्यांना बोनसमध्ये कार, फ्लॅट, स्कुटर देत असतात. त्यांनी आपल्या काही कर्मचाऱ्यांना तर मर्सिडीज कार देखील गिफ्ट दिली आहे. त्यांच्या या वृत्तीमुळे त्यांनी दिलदार बॉस म्हटले जाते. दिवाळीत सर्वाधिक बोनस दिल्यामुळे ते जगभर प्रसिद्ध आहेत. यात त्यांनी अनोखी परंपरा तयार केली आहे.
घरच्या परिस्थितीने 13 वर्षांचे असताना सावजी यांनी शाळा सोडली. 1977 मध्ये ते आपले गाव सोडून सुरतला त्यांच्या काकांकडे आले. तेथे त्यांनी डायमंड ट्रेंडींगमधील बारकावे शिकले. सुरतच्या कारखान्यात 179 रुपये महिना वेतनावर काम केले. त्याकाळी महिन्यातील 140 रुपये खाण्यापिण्यावर खर्च करुन ते 39 रुपये वाचवायचे. सावजी यांनी मित्राकडून हिरा पॉलिशिंगचे काम शिकले. दहा वर्षे त्यांनी हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम केले आणि हळूहळू त्यांचा या व्यापाऱ्यात जम बसला.
1984 मध्ये सावजी यांनी आपले बंधू हिम्मत आणि तुलसी सोबत हरिकृष्णा एक्सपोर्टस् नावाने कंपनी काढली. ही कंपनी डायमंड आणि टेक्सटाईल क्षेत्रात काम करते. या कंपनीचे ते मालक झाले. सहा हजार कामगार त्यांच्या हाताखाली काम करतात. कंपनी गुणवत्ता आणि पारदर्शक व्यवहारासाठी प्रसिद्ध आहे.
हरे कृष्ण डायमंड कंपनीत 25 वर्षे निष्ठेने काम करणाऱ्या तीन मॅनेजरना 11 कोटी किंमतीची मर्सिडीज कार गिफ्ट केली होती. त्यांनी दिवाळीत बोनस म्हणून घर, कार, मोपेड दिली आहे. आठ वर्षे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला त्यांनी एक कोटी रुपयाचा चेक दिला होता. यामुळे सावजी ढोलकीया प्रसिद्ध झाले.