मुंबईत: शून्यातून विश्व उभे करणारे मराठमोळे अशोक खाडे बऱ्याच जणांना माहीतही नसतील, पण या माणसानं कष्टाचं चीज करून 500 कोटींची संपत्ती जमवलीय. अशोक खाडे हे अतिशय गरीब कुटुंबात वाढलेले असूनही त्यांनी कोट्यवधी रुपयांची कंपनी स्थापन केलीय. मातीशी नाळ जोडलेला हा माणूस अजूनही आपला भूतकाळ विसरलेला नाही.
अशोक खाडे हे चिकाटी आणि मेहनतीने आपले भाग्य बदलणारे व्यक्ती आहेत. इच्छाशक्तीच्या बळावर माणूस काय काय करू शकतो हे अशोक खाडेंकडे पाहिल्यावर समजते. जीवनात अत्यंत गरिबी आणि अस्पृश्यताही अशोक खाडेंनी पाहिली. 11 वी बोर्डाच्या परीक्षेदरम्यान पेनची निब बदलण्यासाठी स्वतः अशोक खाडे यांच्याकडे 4 आणे नव्हते. असं म्हणतात, या व्यक्तीच्या कुटुंबाला दोन वेळच्या भाकरीसाठी प्रचंड संघर्ष करावा लागला, पण आज या व्यक्तीच्या कंपनीचा जगभरात 500 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय आहे. खाडे यांच्या विविध कंपन्यांमध्ये 4500 लोक काम करतात.
आजच्या सुप्रसिद्ध कंपनी दास ऑफशोर इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेडचे अशोक खाडे एमडी आणि संस्थापक आहेत. अशोक खाडेंच्या संघर्षाची कहाणी सत्तरच्या दशकात महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात सुरू झाली, जिथे त्यांचा जन्म झाला. पहिली ते सातवीचं शिक्षण अशोक खाडे यांच्याच गावात झालं. आठवी ते 11 वीचं शिक्षण त्यांनी सांगलीतल्या तासगावला घेतले.
विशेष म्हणजे त्यांचे संपूर्ण कुटुंब वारकरी सांप्रदायातले होते. कुर्ल्यातील एका चाळीत त्यांनी खानावळ लावली. तसेच ते चाळीतील पायऱ्यांच्या खालीच झोपत होते. त्यांचं एफवाय सायन्सचं शिक्षणही तिथेच झालं. कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती, त्यामुळे अशोक यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. वडील मुंबईत एका झाडाखाली मोच्याचे काम करायचे. आई 12 आण्यांमध्ये दिवसभर शेतात राबत होती. 6 बहिणी आणि भावांचे संगोपन त्या काळी फारच कठीण होते. त्यामुळे त्यांचे शिक्षण तर दूरच राहिले. गरिबीशी झुंज देत अशोक यांचा मोठा भाऊ दत्तात्रेयने माझगाव डॉकयार्डमध्ये वेल्डिंग अॅप्रेंटिसची नोकरी स्वीकारली, त्यानंतर अशोक यांनीसुद्धा माझगाव डॉकयार्डमध्ये हँडमॅन म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि त्या बदल्यात त्याला 90 रुपये स्टायपेंड मिळू लागला. त्यांच्या मेहनतीने त्यांनी जहाज डिझायनिंगचे प्रशिक्षण घेतले आणि नंतर काम करताना मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केला.
माझगाव डॉकमध्ये त्यांनी चार वर्ष नोकरी केली. त्यानंतर एक वर्ष ते जर्मनीला गेले होते. अशोक यांनी माझगाव डॉकयार्डमध्ये काम करत असताना परदेशात जर्मनीला प्रशिक्षणासाठी गेले, तेव्हा इतर लोकांना त्याच कामासाठी त्यांच्यापेक्षा 12 पटीने जास्त पगार मिळाला आणि त्याच दिवशी त्यांनी यापुढे नोकरी करायची नाही, असं ठरवलं. मी माझा स्वतःचा व्यवसाय करेन. अशोक खाडे यांनी माझगाव डॉक सोडले तेव्हा त्यांच्याकडे फक्त दहा हजार रुपये होते. व्यवसाय सुरू करत असतानाही त्यांच्याकडे जागा नव्हती. कार्यालय नव्हते. त्यांनी एका टेबलावर स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यावेळी त्यांनी वडिलांचं एक वाक्य कायम स्मरणात ठेवलं. अशोक जे तुझं नेचर आहे तेच तुझं फ्युचर होणार आहे, असं वडील त्यांना नेहमीच सांगायचे.
अशोक खाडे यांनी नोकरी सोडून एक कंपनी स्थापन केली आणि दत्तात्रेय, अशोक आणि सुरेश या तीन भावांच्या नावाची पहिली अक्षरे जोडून त्यांनी त्या कंपनीला दास ऑफशोअर इंजिनीअरिंग असे नाव दिले. सुरुवातीला त्यांच्या कंपनीनं समुद्रात तेल काढण्याचे प्लॅटफॉर्म म्हणून काम केले. त्यात त्यांना प्रचंड यश मिळालं आणि आज तिन्ही भावांनी मिळून आणखी अनेक कंपन्या स्थापन केल्यात.
दास ऑफशोर ही आज एक सुप्रसिद्ध कंपनी आहे, जी ओएनजीसी, एल अँड टी, एस्सार आणि भेल यांसारख्या मोठ्या कंपन्यांसाठी काम करते. त्यांच्या कंपनीनं समुद्रात 100 हून अधिक प्रकल्प पूर्ण केलेत. अशोक खाडे यांच्या जीवनात दोन आदर्श व्यक्ती आहेत, ज्यांच्याकडून अशोक यांना पुढे जाण्यासाठी आणि प्रगतीसाठी प्रेरणा मिळते. त्यापैकी एक होते मदर तेरेसा आणि दुसरे होते डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर. आज अशोक खाडे हे केवळ देशासाठीच नव्हे, तर जगातील अशा लोकांसाठी एक उदाहरण आहे, ज्यांना त्यांच्या कष्ट आणि शिक्षणाच्या बळावर पुढे जायचे आहे. न्यूयॉर्क टाईम्सने अशोक खाडे यांच्या संघर्षाची कथाही पहिल्या पानावर प्रकाशित केली होती, म्हणून स्वीडनमध्ये आजही त्यांच्या संघर्षाची कहाणी अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना शिकवली जाते.
संबंधित बातम्या
D-Mart मध्ये स्वस्तात किराणा विकणारा श्रीमंत मालक, कोण आहेत राधाकृष्ण दमानी?
success story Once there was no 25 paise in the pocket, today the owner of 500 crores, who is Ashok Khade?