मुंबई : भारताची बजट एअरलाईन कंपनी गो फर्स्ट दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. देशभरातील विमानतळावर गो फर्स्ट एअरलाईन्सच्या काऊंटरवर सन्नाटा पसरला आहे. एअरलाईन्सच्या कस्टमर केअर लाईन त्रस्त प्रवाशांच्या कॉल्सने बिझी झाल्या आहेत. अशात या एअरलाईन्स कंपनीने येत्या काही दिवसातील सर्व उड्डाने रद्द करीत तिकीटांची बुकींग बंद केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात विमान प्रवास महागण्याची शक्यता आहे. एका बड्या विमान कंपनीच्या सीईओंनी यासंदर्भात माहीती दिली आहे.
गो फर्स्ट एअरलाईन कंपनी कर्जाच्या ओझ्याखाली आहे. या विमान कंपनीने आपण दिवाळखोर जाहीर करावे यासाठी सरकारकडे अर्ज केला आहे. या विमान कंपनीने 15 मे पर्यंतची सर्व बुकींग रद्द केली आहेत. तसेच प्रवाशांना तिकीटाचा रिफंड द्यायचा कि त्यांना पुढच्या प्रवासासाठी ही रक्कम अनामत म्हणून त्याच्या खात्यावर जमा करायची यावर खल चालू असतानाच आता सर्वासामान्यांच्या या ‘बजेट एअरलाईन’च्या ठप्प होण्याने विमान प्रवास महागणार असल्याचे म्हटले जात आहे.
स्पाईसजेटचे सीईओ अजय सिंह यांनी झी न्यूजशी बोलताना सांगितले की जेव्हा मागणी आणि पुरवठा यात मोठी दरी निर्माण होते तेव्हा भाड्यात वाढ होते. गेल्यावेळी देखील एक मोठी एअरलाईन कंपनी बंद पडली तेव्हाही मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठे अंतर निर्माण झाले होते. त्यानंतर विमानांच्या उड्डाणे वाढल्याने हा पुरवठ्यात वाढ होऊन तिकीटाचे दर कमी झाले होते. परंतू हवाई प्रवास स्वस्त झाल्याने पुन्हा प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्याचा त्रासही या एव्हीएशन इंडस्ट्रीला भोगावा लागतो. त्यामुळे विमानाच्या तिकीट दरात तर्कसुसंगता हवी आहे असेही अजय सिंह यांनी सांगितले.
एक एअरलाईन कंपनी बंद झाल्याने देशातील एव्हीएशन इंडस्ट्रीला काही फरक पडणार नाही. काही काळ विमान प्रवास महागणार आहे, परंतू थोडा काळच त्याचा प्रभाव असणार. 30 एप्रिल रोजी 4,50,000 प्रवाशांनी विमान प्रवास केला होता. हा एक रेकॉर्डच आहे. आपल्या ताफ्यात 25 अतिरिक्त विमानांचा समावेश करण्याची स्पाईसजेटची योजना असल्याचे अजय सिंह यांनी सांगितले. कोविड महामारीत आमची अनेक विमाने रिकामी उभी होती, वाढत्या मागणीप्रमाणे आम्ही त्या सर्वांना परिचलनात आणू इच्छीत आहोत असेही ते म्हणाले.