सुकन्या समृद्धी योजनेला (Sukanya Samriddhi Yojana) सरकारचे आर्थिक आणि सामाजिक बळ आहे. ही योजना खास मुलींचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मुलीच्या नावाने आई-वडिलांना ही योजना सुरु करता येईल आणि त्यामाध्यमातून त्यांना भलीमोठी रक्कम जमा करता येणार आहे. व्याजासहित मिळणारी ही रक्कम 21 व्या वर्षी मुलीच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी वापरता येईल. सध्या सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजतर 7.6 टक्के आहे. मुलीच्या नावाने या योजनेत उघडलेल्या खात्यात कमीतकमी 250 रुपयांची गुंतवणूक करता येते. मुलीचे वय 10 वर्षांचे होईपर्यंत या योजनेत खाते (Account) उघडता येते. खात्यात कमीतकमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतविता येते. सामाजिक सुरक्षेच्यादृष्टीने (Social Security) ही योजना सरकारने सुरु केली आहे. मुलीच्या (Girl) उज्जवल भविष्यासाठी(Bright Future) सध्या ही उत्तम योजना मानण्यात येते.
परंतू, सुकन्या समृद्धी योजनेत रक्कम केव्हा जमा करता येते आणि काढता येते, किती काढता येते यासंबंधी लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. नियमानुसार, जेव्हा मुलीचे वय 18 वर्षांच्या होते. अथवा ती इयत्ता दहावी उत्तीर्ण होते, तेव्हा ती या योजनेतून रक्कम काढू शकते. खात्यात एकूण शिल्लकीच्या 50 टक्के रक्कम काढता येते. यासंबंधी टपाल खात्याचा नियम सांगतो की, सुकन्या समृद्धी योजना खात्यात एकरक्कमी अथवा हप्त्यात रक्कम काढता येते. एका वर्षात एकदाच रक्कम काढता येते आणि पाच वर्षांपर्यंत हप्त्यांद्वारे खात्यातील रक्कम काढण्यास परवानगी मिळते.
सुकन्या समृद्धी योजनेत कालावधी पूर्ण होण्यापूर्वी खाते बंद करण्याची सुविधा नुकतीच देण्यात आली आहे. खाते उघडल्यानंतर पाच वर्षाच्या आत ते ग्राहकाला बंद करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. पण त्यासाठी तुम्हाला निकडीचे कारण द्यावे लागते. अत्यंत अपवादात्मकस्थितीच खाते बंद करता येते. खातेधारक मुलीच्या जीवाला धोका असणारा रोग झाल्यास अथवा असाध्य रोग असल्यास, खात्यात रक्कम जमा करणा-या आई-वडिलांपैकी एकाचा मृत्यू झाल्यास खाते बंद करता येते. ज्या टपाल विभागात तुमचे खाते उघडण्यात आले आहे. त्याठिकाणी खाते बंद करण्याचा अर्ज देऊन खाते बंद करता येते.
सुकन्या समृद्धी योजनेचे खाते कालावधी पूर्ण झाल्यानंतर बंद करता येते. या योजनेचा कालावधी 21 वर्षांचा आहे. हा कालावधी खाते उघडल्यापासूनचा आहे. मुलीच्या लग्नासाठी या योजनेतून पूर्ण रक्कम काढता येते, पण त्यासाठी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण होणे गरजेचे आहे. अशावेळी लग्नासाठी खात्यातून पूर्ण रक्कम काढता येते. खात्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर खाते बंद करता येते. लग्नाच्या एक महिने अगोदर अथवा मुलीचे लग्न झाल्यानंतर पुढील तीन महिन्यानंतर खाते बंद करता येते.