मुंबई: विमानातून प्रवास करणे जसे प्रत्येकासाठी आकर्षण असते, तसेच पाण्याखालून प्रवास आकर्षण ठरणार आहे. लवकरच दुबई ते मुंबई पाण्याखालून धावणारी जलद रेल्वेसेवा चालू करण्याचा विचार दुबई करत आहे. हायपरपूल आणि ड्रायविंगलेस फ्लाईंग कारनंतर यूएई आता पाण्याखालून धावणारी रेल्वे चालू करण्याचा विचारात आहे. दुबई ते मुंबई प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे या प्रवाशांना नवा पर्याय म्हणून आता पाण्याखालून प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन देण्याची शक्यता आहे.
खलीज टाईम्सच्या वृत्तानुसार, अबू धाबीमध्ये यूएई-इंडिया कॉनक्लेवदरम्यान नॅशनल अॅडवायजर ब्युरो लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ कंसल्टेंट अब्दुल्ला अलशेही यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
अलशेही हे कन्सल्टंट फर्म नॅशनल अॅडवायजर ब्युरो लिमिटेडचे संस्थापक आहेत. त्यांनी सांगितले की, पाण्याखालून चालू होणाऱ्या यूएई ते भारत रेल्वेचा फायदा इतर देशांनाही होऊ शकतो. तसेच या रेल्वेच्या माध्यामातून तेल, अन्न आणि इतर गोष्टींचीही आयात-निर्यात करणार आहे. सध्यातरी हा एक विचार आहे, आम्ही भारतातील मुंबई शहराला पाण्याखाली जलद गती रेल्वेने जोडण्याचा विचार करत आहे. यामुळे दोन्ही देशांचा फायदा होईल असा विश्वासही अलशेही यांनी व्यक्त केला.
अलशेही पुढे म्हणाले, या रेल्वेच्या माध्यमातून तेलाचे आयात निर्यात केले जाईल, त्यासोबतच नर्मदा नदीच्या अतिरीक्त पाण्याचीही निर्यात होईल. या महत्वाकांक्षी प्रोजेक्टसाठी आमचा अभ्यास चालू आहे. हा विचार वास्तव्यात उतरला तर हा रेल्वे मार्ग 2000 किमी चा असेल.