रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने अजून एक क्रिकेट विश्वकप नावावर केला. ICC Men’s T20 World Cup मध्ये भारतीय टीमने जोरदार कामगिरी केली. ही कामगिरी लोकांनी याची देहि, याची डोळा टीव्हीवर पाहिली. तर डिस्नी+हॉटस्टार सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर रीअल टाईममध्ये 5 कोटींपेक्षा अधिक प्रेक्षक World Cup Final पाहत होते. यावरुनच तुम्हाला अंदाज लावता येईल की, डिस्नी स्टारने प्रत्येक सेकंदाला किती कमाई केली असेल?
भारताची विश्वचषकात दमदार कामगिरी
भारताने दक्षिण आफ्रिकाच्या संघाला 7 धावांनी पराभूत केले. 176 धावांच टप्प्यातील लक्ष्य गाठतांना आफ्रिकन संघाची दमछाक झाली. भारतीय गोलदांज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी कमाल दाखवली. सांघिक खेळाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिका संघाच्या हातून सामना खेचून आणला. दक्षिण आफ्रिका 169 धावांवरच गुंडाळल्या गेला. पण या दरम्यान जाहिरातींच्या माध्यमातून डिस्नी स्टारचा कमाईचा धावफलक हालता होता.
भारता अंतिम सामन्यात, डिस्नी स्टारला लागली लॉटरी
आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताने निर्विवाद धडक दिली. त्यामुळे डिस्नी स्टारला लॉटरी लागणार हे जवळपास निश्चित झाले होते. कंपनीने सामन्यादरम्यान त्यांचे उर्वरीत टीव्ही अॅड स्लॉट्सची किंमत वाढवली. या दरवाढीने डिजिटल प्लॅटफॉर्मवर डिस्नेने तुफान कमाई केली.
प्रत्येक सेकंदाला मोठी कमाई
डिस्नी स्टारकडे आयसीसी सामन्याचे टीव्ही प्रक्षेपण अधिकार होते. त्यामुळेच स्टार चॅनलवर लाखो प्रेक्षक लाईव्ह सामना पाहत होते. कंपनीने अंतिम सामन्यासाठी जाहिरातीचा दर 25 ते 30 लाख रुपये प्रति 10 सेंकद केला होता. म्हणजे डिस्नेने प्रत्येक सेकंदाला जवळपास 2.5 ते 3 लाख रुपयांची कमाई केली.
भारता नसता तर मोठे नुकसान
या जागतिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वीच भारत बाहेर पडला असता डिस्ने आणि इतर कंपन्यांचे मोठे नुकसान झाले असते. या काळात स्टार स्पोर्ट्सने त्यांच्या वाहिनीवरील जाहिरातीचा दर 13 ते 26 लाख रुपये प्रति 10 सेंकद असा केला होता. ईटीच्या वृत्तानुसार, भारताने अंतिम सामन्यात प्रवेश करताच स्टार स्पोर्ट्सने जाहिरात दरात मोठी वाढ केली. जर भारत अंतिम सामन्यात गेला नसता तर इतका मोठा प्रेक्षक वर्ग मिळाला नसता आणि त्या आधारे जाहिरात दर वाढविता आले नसते.
या 55 सामन्यात डिस्नी स्टारने भारत आणि इतर मॅचमध्ये 10 सेकंदाच्या स्लॉटसाठी 13 ते 26 लाख रुपये जाहिरातीसाठी घेतले. तर इतर देशांच्या सामन्यासाठी त्याने जाहिरात दर 6.5 ते 7 लाख रुपये प्रति 10 सेंकद असा ठेवला होता.