नवी दिल्ली : टाटा हा देशातील सर्वात बहुमुल्य, मूल्यवान ब्रँड असल्याची मोहोर लागली आहे. टाटा समूहाविषयी प्रत्येक भारतीयाच्या मनात एक खास जागा आहे. रतन टाटा (Ratan Tata) यांच्या नम्रता, विनयशीलतेची या ब्रँडला खास झळाळी लागली आहे. जमिनीपासून ते आकाशापर्यंत टाटा समूहाचे अधिराज्य आहे. मीठापासून ते जग्वारपर्यंत टाटा यांचे अधिराज्य आहे. टाटाच्या कार, एअर इंडिया, टेक, फायनान्स, हाऊसिंग याच नाहीतर इतर अनेक क्षेत्रात टाटाने त्यांची अमीट छाप सोडली आहे.. टाटावर ग्राहक डोळे झाकून विश्वास ठेवातात, गुणवत्तेशी ते तडजोड करत नाही, हे त्यामागील कारण आहे. केवळ नफा कमाविणे हा या ब्रँडचा उद्देश नाही तर देशासह नागरिकांचे हित या समूहाला महत्वाचे वाटते. त्यामुळेच टाटा हा देशातील मोस्ट व्हॅल्युअबल ब्रँड (Most Valued Brand) ठरला आहे.
टाटा ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. टाटाचे मार्केट कॅप 21,10,692 कोटी रुपयांवर पोहचले आहे. तर रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील दुसरी सर्वात मौल्यवान कंपनी ठरली आहे. मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी दुसरा ब्रँड ठरली आहे. रिलायन्सचे मार्केट कॅप 15,99,956 कोटी रुपये आहे. या यादीत गौतम अदानी यांना मात्र धक्का बसला आहे. अदानी समूह पिछाडीवर आहे. अदानी समूहाचे मूल्य घसरुन 9,29,860 कोटी रुपये झाले आहे.
अदानी समूह मूल्यवान ब्रँड म्हणून देशातील क्रमांक एकची कंपनी होती. परंतु, हिंडनबर्ग रिपोर्टच्या वादळाने या समूहाला धक्का दिला. या कंपनीचे मूल्यांकन घसरत गेले. अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर झरझर घसरले. त्यामुळे ही कंपनी टाटा आणि रिलायन्सपेक्षा ही क्रमवारीत खाली घसरली. यापूर्वी 16 सप्टेंबर 2022 रोजी अदानी यांनी अंबुजा सिमेंट्स आणि एसीसीचे अधिग्रहण केले होते. टाटाला मागे सारत, अदानी समूहाने पहिला क्रमांक पटकावला होता. परंतु हा आनंद केवळ दोन महिनेच टिकला. नोव्हेंबर 2022 मध्ये टाटा समूहाने पुन्हा पहिला क्रमांक पटकावला.
अदानी समूहातील अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण सुरु आहे. त्यामुळे या कंपनीचा मार्केट कॅप सातत्याने घसरत आहे. 25 जानेवारी रोजी टाटा आणि रिलायन्सचे मार्केट कॅप अनुक्रमे 2% आणि 4% घसरले. तर अदानी समूहाचे आतापर्यंत 51% हून अधिक नुकसान झाले. अदानींना शेअर बाजारात नुकसान झाल्याने ते या यादीत तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. देशातील सर्वाधिक मूल्यवान ब्रँड असलेल्या कंपन्यांमध्ये टाटा, रिलायन्स आणि अदानी यांच्यासह बजाज, आदित्य बिर्ला, महिंद्रा, ओपी जिंदल आणि वेदांता या समूहाचाही समावेश आहे.