महागाईने (Inflation) बेहाल झालेल्या नागरिकांना गुंतवणुकीचा कोणता पर्याय तारु शकतो, हा प्रश्न नवख्या गुंतवणुकदाराला हमखास पडतो. फसवणूक ही नको, नुकसानही नको आणि रक्कम ही सुरक्षित रहावी असे धोरण असलेल्या गुंतवणुकदाराला गुंतवणुकीची एक चांगली संधी आहे. बँकेतील बचत खाते, मुदत ठेवीपेक्षा ही या पर्यायामध्ये ग्राहकाला चांगला परतावा मिळतो. मुदत ठेवीत रक्कम गुंतवणुकीकडे अनेकांचा ओढा असतो. सध्या मुदत ठेवीवरील(FD) व्याजदरात ब-यापैकी वाढ झालेली आहे. त्यामुळे अनेकांना मुदत ठेवीत गुंतवणूक करणे योग्य वाटत आहे. आर्थिक सल्लागारांचा(Finance Expert) सल्ला मानला तर गुंतवणूक ही नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी करणे फायद्याचे ठरते. त्यामुळे या परंपरागत गुंतवणूक पर्यायाव्यतिरिक्त टॅक्स फ्री बाँड (Tax Free Bond) हा परताव्याच्या दृष्टिकोनातून चांगला पर्याय आहे. विशेष म्हणजे ही गुंतवणूक कर सवलतीसह मिळते.
सरकारी बाँड वा टॅक्स फ्री बाँड सरकारी संस्था अथवा कंपन्या बाजारात दाखल करतात. बाजारातून पैशांची उभारणी करणे हा त्याचा उद्देश आहे. अर्थसंकल्पात सरकार, बाजारातून किती रक्कम उभी करायची याचे उद्दिष्ट निर्धारीत करते. अशावेळी सरकार बाँडची मदत घेते. उदाहरणादाखल तुम्ही महानगरपालिकेचा बाँड घेऊ शकता. या बाँड खरेदीवर तुम्हाला एक निश्चित व्याज देण्यात येते. तसेच हा बाँड डबघाईला येण्याचा वा डुबण्याचा कोणताही धोका नसतो. या बाँडचे सर्वात वेगळे आणि महत्वाचे वैशिष्टये म्हणजे याचे कर मुक्त धोरण. प्राप्तीकर कायदा (Income Tax Act) 1961 चा नियम 10 नुसार सरकारी बाँडवरील व्याजावर कुठला ही कर आकारण्यात येत नाही.
टॅक्स फ्री बाँडची मर्यादा दहा वर्षांची असते. याला दीर्घकालीन गुंतवणुकीच्या (Long term investment) श्रेणीत सुचीबद्ध करण्यात येते. गुंतवणुकदार या बाँडमध्ये अधिकची रक्कम गुंतवतात. यामधून जमा झालेला पैसा सरकार विकास कामांसाठी खर्च करते. ही रक्कम सरकार गृहप्रकल्प आणि इतर प्रकल्पात गुंतविते. ज्येष्ठ नागरिकांसाठी या प्रकारची गुंतवणूक फायदेशी मानण्यात येते. एकतर याला सरकारच्या सुरक्षेची हमी मिळते आणि यामाध्यमातून एक निश्चित परतावा ही मिळतो. जे व्यापारी, व्यावसायिक हजारोंचा कर भरणा करतात, तेही या योजनेत रक्कम गुंतवितात. या प्रकारच्या बाँडमध्ये कोणत्याही प्रकारचा टीडीएस कपात होत नाही.
टॅक्स फ्री बाँडचा परतावा त्यातील गुंतवणुकीवर अवलंबून आहे. हा बाँड अधिक कमाई करणा-या लोकांना देण्यात येतो. याची संख्या कमी ठेवण्यात येते. एका ठराविक संख्येतच या बाँडची खरेदी करत येते. या बाँडवर व्याज दर (interest rate) हा सामान्यतः 5.50 ते 6.50 टक्क्यांच्या दरम्यान असते. त्यामुळे बचत खाते आणि मुदत ठेव यांच्यापेक्षा यातील गुंतवणूक चांगली मानण्यात येते. बाँडचा परतावा महागाईला थोपविण्यास मदत करते.