नवी दिल्ली | 12 ऑगस्ट 2023 : जून आणि जुलै महिना भारतीयांसाठी महागाईचे (Inflation) चटके देणारा ठरला. भारतात प्रत्येक वस्तू महाग झाली. आतापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात संताप होता. पण गेल्या दोन महिन्यात टोमॅटोसह इतर भाजीपाल्याच्या (Vegetable-Tomato Rate) किंमती गगनाला भिडल्या आहेत. डाळी, तांदळाने, गव्हाने उच्चांक गाठला आहे. दुधाने तर आधीच सर्व रेकॉर्ड मोडले आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंवर भारतीयांचा मोठा खर्च होत आहे. मध्यमवर्ग आणि गरीबांची तर देशात थट्टा सुरु आहे. त्यांना जगणे मुश्कील झाले आहे. कितीही कमाई केली तरी पैसा हातात उरत नसल्याने त्यांची कसरत सुरु आहे. केंद्र सरकारने (Central Government) या महागाईवर जालीम उपाय शोधला आहे. त्यासाठी तातडीने पावले पण टाकली आहे. त्याचा परिणाम येत्या काही दिवसांत दिसून येईल. वाढलेले दर पुन्हा जमिनीवर येतील.
असा लावणार महागाईला ब्रेक
महागाईला ब्रेक लावण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल टाकले आहे. नेपाळकडून टोमॅटो आणि इतर भाजीपाला आयात करण्यास मंजूरी दिली. तर केंद्र सरकार आफ्रिकेतून डाळींची खरेदी करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी संसदेत याविषयीची माहिती दिली. याविषयीचा करार पण करण्यात आला आहे.
नेपाळाचे टोमॅटो बाजारात
जीवनावश्यक वस्तू स्वस्त करण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. शेजारील नेपाळमधून टोमॅटोच्या आयातीवर आता कोणतेही प्रतिबंध राहणार नाही. त्यासाठी आयात सुरु करण्यात आली आहे. टोमॅटोची पहिली खेप वाराणसी, लखनऊ आणि कानपूर शहरात पोहचली आहे. काही दिवसांतच टोमॅटोची मोठी आवक नेपाळमधून होईल.
टोमॅटोचा चढता आलेख
दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोच्या किंमती 25-30 रुपये किलो होत्या. आता या किंमती 150 ते 250 रुपये प्रति किलो आहे. तर काही ठिकाणी हा भाव 220-300 रुपये प्रति किलोवर पोहचला आहे. व्यापारी, दलाल हे जास्त नफा कमावत आहे. तर शेतकऱ्यांना पण यंदा चांगला भाव मिळाला आहे. पावसाने ओढ दिल्यास दक्षिण राज्यात सुद्धा टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
किंमती घसरतील
भारतात अवकाळी आणि मुसळधार पावसाने पिकांचे गणित चौपट केले. त्यामुळे भाजीपाला महागला. टोमॅटोने तर दरवाढीची कुठलीच कसर बाकी ठेवली नाही. काही शहरात टोमॅटो 300 रुपये किलोने विक्री झाला. पण नेपाळमधून आयात सुरु झाल्यापासून टोमॅटोच्या किंमतीत मोठी घसरण दिसून येत आहे.
नेपाळच्या शेतकऱ्यांना लॉटरी
नेपाळमधील काठमांडू, ललितपूर आणि भक्तपूर या जिल्ह्यात टोमॅटोचे बम्पर उत्पादन झाले. भारतमध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात टोमॅटो महाग झाले. नेपाळमध्ये याच काळात योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी 70000 किलो टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले होते. पण भारताच्या निर्णयाने शेतकऱ्यांना लॉटरी लागणार आहे.
नेपाळला हवी साखर, तांदूळ
कृषी मंत्रालयाच्या प्रवक्त्या शिवकोटी यांनी नेपाळकडे टोमॅटोसह हिरवी मिरची आणि इतर भाजीपाला पाठविण्याची विनंती केली आहे. तर नेपाळाने भारताकडे तांदूळ, साखर पाठविण्याची विनंती केली आहे. नेपाळला भारताकडून एक लाख टन बासमती आणि तत्सम तांदूळ, 10 लाख टन साधा तांदूळ, 50 हजार टन साखर पुरविण्याची विनंती करण्यात आली आहे.
आयात शुल्क हटवले
डाळींच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. दिल्लीच नाही तर देशातील अनेक राज्यात तूरडाळ 140 ते160 रुपये किलोवर पोहचली आहे. उडद डाळ, मसूर आणि इतर डाळी सुद्धा दरवाढीच्या मार्गावर आहेत. दरवाढीला लगाम घालण्यासाठी आफ्रिकेतून डाळीची आयात करण्यात येणार आहे. त्यासाठी आयात शुल्क हटविण्यात आले आहे. 31 मार्च 2024 रोजीपर्यंत कोणत्याही अटी-शर्तीविना, प्रतिबंध, शुल्काशिवाय भारत डाळींची आयात करणार आहे. त्यासाठी आफ्रिकन देशांशी करार करण्यात आला आहे. यापूर्वी तूरडाळीवर 10 टक्के आयात शुल्क आकारण्यात येत होते.