नवी दिल्ली : देशातील या श्रीमंत घराण्यांनी केंद्र सरकारला मालामाल केले. त्यांनी सरकारी तिजोरीत भरभरुन धन जमवले. कराच्या माध्यमातून या श्रीमंतांनी मोठी रक्कम जमा केली. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये केंद्र सरकारने टॅक्समधून जोरदार कमाई केली. गेल्या आर्थिक वर्षात भारतीय उद्योग जगताने केंद्र सरकाला मोठे उत्पन्न मिळवून दिले. बीएसई 500 कंपन्यांनी (BSE 500 Firms) गेल्या आर्थिक वर्षात जवळपास 3.60 लाख कोटी रुपये तिजोरीत जमा केले. यामध्ये अर्थातच टाटा समूह (Tata Group) सर्वात अग्रेसर आहे. तर इतर अनेक श्रीमंत कुटुंबांचाही हातभार लागला आहे. कोणती आहेत ही घराणी, किती टॅक्स त्यांनी जमा केला आहे. .
टॉप-500 कंपन्यांचे इतके योगदान
आकड्यांनुसार, देशातील 500 सूचीबद्ध कंपन्यांनी गेल्या आर्थिक वर्षात कॉर्पोरेट टॅक्सच्या (Corporate Tax) माध्यमातून सरकारी खजिन्यात 3.64 लाख कोटी रुपये जमा केले. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये या कंपन्यांनी 3.41 लाख कोटी रुपये जमा केले होते. त्यातुलनेत गेल्यावर्षी 7 टक्के अधिक कर जमा झाला आहे. केंद्र सरकाला कॉर्पोरेट टॅक्समधून पण आता अधिक कमाई होत असल्याचे स्पष्ट होते.
टाटाच्या अगोदर सरकारी कंपन्या
सरकारच्या तिजोरीत सरकारी कंपन्यांनी सर्वाधिक कर जमा केला आहे. सर्व सूचीबद्ध सरकारी कंपन्यांनी मिळून आर्थिक वर्ष 2022-23 दरम्यान 1.08 लाख कोटी रुपये कर जमा केला आहे. तर खासगी क्षेत्रात सर्वात अग्रेसर अर्थातच टाटा समूह आहे. टाटा समूहाने गेल्या आर्थिक वर्षात सरकारी खजिन्यात 30 हजार कोटी रुपयांहून अधिक योगदान दिले आहे. बीएसई-500 इंडेक्स मध्ये टाटा समूहाच्या एकूण 17 कंपन्या आहेत.
टॉप-5 मध्ये कोणते समूह
टाटा समूहानंतर भारतात सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या कंपनीचा क्रमांक लागतो. अंबानी यांच्या रिलायन्स समूहातील कंपन्यांनी गेल्या आर्थिक वर्षात 20,730 कोटी रुपयांचा आयकर जमा केला. तर आता विलिनीकरणामुळे गाजत असलेल्या एचडीएफसीने 20,300 कोटी रुपयांचा कर जमा केला. आयसीआयसीआय ग्रुप पाचव्या स्थानावर आहे. या बँकेने 12,800 कोटी रुपये योगदान दिले. एचडीएफसी आणि आयसीआयसीआय या समूहाच्या प्रत्येकी 4 कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत.
बजाज आणि वेदांता पण नाही मागे
बजाज समूहाच्या कंपन्यांनी मिळून गेल्या आर्थिक वर्षात 10,554 कोटी रुपयांचा कर भरणा केला. बीएसई-500 मध्ये या समूहाच्या एकूण 6 कंपन्या असून कर भरण्यात बजाज समूह सहाव्या स्थानावर आहे. सातव्या क्रमांकावर अनिल अग्रवाल यांचा वेदांता समूह आहे. या समूहाने 10,547 कोटी रुपयांचा कर भरला आहे. बीएसई-500 निर्देशांकात वेदांताच्या दोन कंपन्या सूचीबद्ध आहे.
इतर तीन कंपन्या कोणत्या
कुमार मंगलम बिर्ला यांच्या आदित्य बिर्ला समूहाने 10,100 कोटी रुपये कर भरला. ही कंपन्या आठव्या स्थानावर आहे. नवव्या स्थानावर जगातील सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचे नाव आहे. या कंपनीने 9,200 कोटी रुपये कॉर्पोरेट इनकम टॅक्स जमा केला आहे. तर 10 व्या स्थानावर असलेल्या एक्सिस बँक 7,768 कोटी रुपये कर जमा केला आहे.