मुंबईः सोनं खरेदीबाबत बऱ्याचदा ग्राहक संभ्रमात असतात, सोने आता खरेदी करू की काही दिवस वाट पाहू, असा त्यांना प्रश्न पडलेला असतो. सोनं हा आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे. कधी दागदागिने स्वरुपात तर कधी वळं, नाणी किंवा बिस्किटाच्या स्वरुपात ते प्रत्येकाच्या संग्रही असते, असं मत गुंतवणूक तज्ज्ञ आणि माय वेल्थ ग्रोथ डॉट कॉमच्या हर्षद चेतनवाला यांनी व्यक्त केलं आहे.
प्रत्येकाचा सोन्याकडे बघण्याचा उद्देश गुंतवणूक म्हणून असेलच असा नाही. दृष्टिकोन कसलाही असो सोन्याला आपल्या आयुष्यात नेहमी एक विशेष महत्त्वाचे स्थान लाभले आहे आणि कायम राहील. सध्या सोन्याच्या खरेदीत पैसे गुंतवावे किंवा नाही हे ठरवण्यासाठी काही ठोस विचार करणेसुद्धा आवश्यक आहे. सर्वप्रथम आपल्या एकूण गुंतवणुकीच्या किती टक्के आपण सोन्यात गुंतवले आहेत अथवा किती टक्के पैसा गुंतवणे योग्य आहे, यावर विचार करणे आवश्यक असल्याचंही गुंतवणूक तज्ज्ञ आणि माय वेल्थ ग्रोथ डॉट कॉमच्या हर्षद चेतनवाला यांनी सांगितलं आहे.
यात वैयक्तिक दागदागिन्यांचे मूल्य धरता येत नाही. आपण दागिने विकून पैसे उभे करणार असाल तर सोन्याचा नक्कीच गुंतवणूक म्हणून विचार करू शकता. गुंतवणूकदारांचेही दोन प्रकार आहेत. एक समजून उमजून सोन्यात पैसा गुंतवणारे आणि दुसरे सहज अथवा इतर कशात गुंतवण्यापेक्षा सुरक्षित पर्याय म्हणून गुंतवणारे असतात. एकूण बचतीच्या ५ ते १० टक्के पैसा सोन्यात गुंतवणे आदर्श मानले जाते. वैयक्तिक गरज आणि गुंतवणुकीचा उद्देश यावर हे अवलंबून असते. गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. जानेवारी २०२० पासून म्हणूनच गुंतवणूकदारांचे लक्ष्य सुवर्ण खरेदीकडे आहे. काहींनी या वर्षी सोन्यात पैसे गुंतवायला सुरुवात केली आहे आणि काही जण अजून यात पैसे गुंतवू की वाट पाहू, अशा संभ्रमात आहेत. जगभरात अस्थिरता /अनिश्चितता वाढली की सोन्याचे भाव वाढतात. कारण ह्या काळात सोनं हा सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय वाटतो आणि ते खरंही आहे.
सध्याच्या कोरोनाच्या काळात आणि 2008 सालातील मंदी अशा गोंधळाच्या वातावरणातही गुंतवणूकदारांना सोन्यातील गुंतवणूक विश्वासार्ह्य वाटत आली आहे. अशा काळात सोनं हा इतर अनिश्चित अथवा नुकसानकारक पर्यांयापेक्षा एक सुरक्षित आणि मोठा फायदा देणारा गुंतवणुकीचा पर्याय ठरतो. त्यामुळेच कदाचित आवश्यकतेपेक्षा जास्त पैसा सोन्यात गुंतवला जातो. सुवर्ण गुंतवणुकीचा विचार करताना आपण हेही लक्षात घेतला पाहिजे की मंदीत सोन्याचे भाव वाढतात आणि मग काही काळ स्थिरावतात. भाव बराच काळ मग सरळ रेषेत राहतात. सोनं ही एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे. सोन्याचे भाव 2008 पासून 2012पर्यंत वाढत गेले. नंतर मात्र ते जवळपास एका स्तरावर स्थिरावलेले आहेत.
जागतिक अनिश्चित वातावरण, सध्याची कोरोना महामारी याच बरोबर मागणी आणि पुरवठा, चलनाचे मूल्यांकन आणि देशातील सुवर्ण साठा हे सोन्याच्या किमतींवर परिणाम करणारे इतर घटक आहेत. सोने हे एक उत्तम आणि जागतिक चलन आहे हे निर्विवाद सत्य आहे. म्हणूनच प्रत्येक जण आपल्या बचतीतून सोन्यात गुंतवणूक करीत असतो. पण प्रामुख्याने यात पैसे गुंतवताना सोन्याची आजची किंमत आणि इतर गुंतवणूक पर्यायातून मिळणारा परतावा या गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. ठराविक प्रमाणात आपल्याकडे सोनं असेल तर अनावश्यक अधिक गुंतवणूक यात करणे फारसे योग्य नाही. अशा वेळी गुंतवणुकीच्या इतर पर्यायांचाही विचार करणं आवश्यक आहे. आपण सोन्यातील गुंतवणुकीची आता सुरुवात करत असाल किंवा आधी इतर कुठे गुंतवणूक केलेली असल्यास सुनियोजित गुंतवणूक योजने(SIP)तही पैसे गुंतवू शकता. त्यासाठी सुवर्ण बचत म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं केव्हाही योग्यच ठरेल.
( गुंतवणूक तज्ज्ञ, MyWealthGrowth.com )
संबंधित बातम्या :
म्युच्युअल फंडासाठी RBI कडून 50 हजार कोटींचा निधी
Rule of 72: PPF, SSY, KVP, NSC किंवा Mutual Funds मध्ये असा करा पैसा दुप्पट