नवी दिल्ली : तुम्हाला अलिकडच्या काळात भारतातीलच नाही तरी जगातील टॉप-10 धनकुबेरांची (Billionaire of World) माहिती असेलच. जगातील श्रीमंतांच्या यादीत टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क हे पहिल्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 230 अब्ज डॉलर आहे. त्यानंतर फ्रान्सचे बर्नार्ड आरनॉल्ट हे 196 अब्ज डॉलरसह दुसऱ्या स्थानावर आहेत. ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस 151 अब्ज डॉलर नेटवर्थसह तिसऱ्या स्थानावर आहेत. सध्या आशिया आणि भारतात रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे अब्जाधीश आहेत. त्यांच्यानंतर अदानी समूहाचे मालक गौतम अदानी हे भारतीय श्रीमंत आहेत. पण स्वतंत्र भारताच्या पहिल्या अब्जाधीशाचे (India’s First Billionaire) नाव तुम्हाला माहिती आहे का? त्यावेळी केंद्र सरकारने त्याचे चांगलेच नाक ठेचले होते, कोण आहे हा गर्भश्रीमंत?
ऑपरेशन पोलो कधी ऐकलं काय
भारत 1947 साली स्वतंत्र झाला. पण इंग्रजांच्या खोडीमुळे देशात अनेक राजे, संस्थानिक तसेच स्वतंत्र होते. त्यांना पाकिस्तान अथवा हिंदुस्थान यापैकी एकाची निवड करावी अथवा स्वतंत्र रहावे अशी सवलत देण्यात आली होती. अनेक संस्थांनी, राजांनी स्वतंत्र भारताला कौल दिला होता. पण जुनागड आणि हैदराबादचा निजामाची हेकेखोरपणा थांबत नव्हता. भारताचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी युद्धाच्या तयारीत असलेल्या निजामाला धडा शिकवायचे ठरवले. त्यासाठी 1948 साली ऑपरेशन पोलो राबविण्यात आले. पोलीस ॲक्शन कारवाई म्हणून ही गाजली. यात निजाम नाक घासत भारताला शरण आला होता.
गर्भश्रीमंत कोण?
आता तुम्ही म्हणाल हे मध्येच निजामाचं काय काढलं. तर हा निजामचं स्वतंत्र भारताचा पहिला गर्भश्रीमंत होता. देशाचा पहिला अब्जाधीश होण्याचा मान निजामाला मिळाला होता. मीडिया रिपोर्टसनुसार टाईम्स मॅगझिनने त्यांच्या 22/02/1937 च्या अंकात मुख पृष्ठावर निजामाचा फोटो छापत, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असे शीर्षक दिले होते. तर या निजामाचे नाव होते मीर उस्मान अली खान. अंहकाराने त्याची माती केली, हे इतिहासाने दाखवून दिले.
अब्जावधींचा डोलारा
निजाम मीर उस्मान अली खान यांच्याकडे अफाट संपत्ती होती. तो या अगणित संपत्तीचा बेताज बादशाह होता. अलीच्या परदेशी बँकेतील खात्यात अब्जावधी रुपये जमा होते. आजही इंग्लंडच्या एका बँकेत त्याचे 3 अब्ज रुपये जमा आहेत.
श्रीमंतीची नाही तर ही चर्चा
निजामाच्या श्रीमंतीची नव्हती असे नाही. सर्वांनाच माहिती होते की तो गर्भश्रीमंत आहे. त्याच्याकडे अफाट माया होती. परदेशातही त्यांची मोठी संपत्ती होती. पण त्याच्या श्रीमंतीच्या चर्चेऐवजी त्याच्या कंजुषपणाच्या चर्चा हैदराबादच नाही तर इंग्रजांच्या सदरीवर खूप गाजल्या. त्याच्या शयनगृहाची वर्षातून एकदाच साफसफाई करण्यास परवानगी होती. पाहुण्यांची सरबराई करण्यात तो अत्यंत कंजुष होता. जेवणाऐवजी चहा-बिस्किटांवरच तो बोळवण करत असे. मीर उस्मान अली खान 1911 साली निजाम झाला. हैदराबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत तो या पदावर राहिला. गर्भश्रीमंत असला तरी त्याने साधेपणा जपला होता.
किती होती संपत्ती
निजामची एकूण संपत्ती 17.47 लाख कोटी रुपये असल्याचे मानण्यात येते. 1947 मध्ये निजामची एकूण संपत्ती अमेरिकेच्या एकूणी जीडीपीच्या 2 टक्क्यांइतकी होती. हैदराबाद संस्थानची स्वतंत्र चलन व्यवस्था होती. निजामची स्वतःची एअरलाईन कंपनी होती. मीडिया रिपोर्टनुसार, निजामाकडे 100 दशलक्ष पौंड सोने, 400 दशलक्ष पौंडचे रत्न, दागिने, आभुषणे होती. जगाला हिऱ्यांचा पुरवठा करणारी गोलकोंडा खाण ही निजामाच्या उत्पन्नाचा खरा स्त्रोत होती.