नवी दिल्ली : सोन्याच्या वाढत्या भावामुळे (Gold Price) सर्वच जण हैराण झालेले आहेत. गुंतवणूकदारांसाठी (Investors) चांगली संधी असली तरी, खरेदीदार मात्र चिंतेत आहेत. लग्नसराईत सोन्याचा भाव वाढल्याने वधू-वर मंडळी चिंताग्रस्त आहेत. पण लवकरच ही समस्या दूर होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी अर्थसंकल्पानंतर (Budget 2023) सोन्याचा दर कमी होण्याची शक्यता आहे. वाणिज्य मंत्रालयाने (Ministry of Commerce) याविषयीचे पाऊल उचलले आहे. त्याचा परिणाम येत्या काही दिवसात दिसून येईल. गुंतवणूकदारांसोबतच खरेदीदारांची लवकरच बल्ले बल्ले होणार आहे.
वाणिज्य मंत्रालयाने रत्न आणि आभूषण उद्योगाला (James And Jewellery) प्रोत्साहन देण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्कात (Import Duty) कपात करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. सूत्रांनी याविषयीची माहिती दिली आहे. हा निर्णय झाल्यास सोने खरेदीदारांसाठी ही मोठी संधी असेल.
केंद्र सरकारने यावर्षी जुलै महिन्यात आयात शुल्कात मोठी वाढ केली होती. आयात शुल्क 10.75 टक्क्यांहून थेट 15 टक्के केले होते. चालू खात्यातील घट कमी करण्यासाठी आणि सोन्याची वाढती आयात थांबविण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल टाकले होते. या नवीन आयात शुल्कानुसार, मुळ 12.5 टक्के कर तर 2.5 टक्के कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर लावण्यात आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, रत्न आणि आभुषण उद्योगाने (Jems & Jewellery Industry) आयात शुल्काविषयी नाराजी व्यक्त केली होती. आयात शुल्कात कपात करण्याची मागणी केली होती. तसेच इतर उत्पादनावरील आयात शुल्क कमी करण्याची विनंती केली आहे. त्यानंतर याविषयीचा प्रस्ताव वाणिज्य मंत्रालयाने तयार केला आहे.
रत्न आणि आभुषण निर्यात प्रोत्साहन परिषदेचे (GJEPC) माजी संचालक कोलिन शाह यांनी फेब्रुवारीतील अर्थसंकल्पाकडून मोठी अपेक्षा व्यक्त केली आहे. निर्यात वाढीसाठी केंद्र सरकार मदत करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आयात शुल्क घटविण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे.
वाणिज्य मंत्रालयाने आगामी अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क कपातीचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव मंत्रालय अर्थमंत्रालयाकडे सादर करेल. रत्न आणि आभुषणांची निर्यात वाढविण्यासाठी कपात आवश्यक असल्याचा सल्ला मंत्रालयाने दिला आहे. आयात शुल्कात बदल झाल्यास, सोन्याचा भाव कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.