नवी दिल्ली : शेअर बाजारात केव्हा कोणता स्टॉक काय कमाल घडवेल, हे तज्ज्ञांशिवाय कोणी ही सांगू शकत नाही. कधी कधी तज्ज्ञ पण चाट पडावेत, अशी कामगिरी शेअर फत्ते करतात. गेल्या काही दिवसांपासून बाजारातून म्हणावा तसा परतावा मिळविण्यात गुंतवणूकदार यशस्वी झालेले नाहीत. पण काही स्टॉक त्याला अपवाद ठरतात. दीर्घकालीन गुंतवणुकीत हे शेअर गुंतवणूकदारांना मालामाल करतात. शेअर बाजारात (Share Market) असे काही स्टॉक्स आहेत, जे फारसे चर्चेत नसताना, त्यांनी गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा (Best Return) दिला आहे. या स्टॉकने पण असाच मास्टर स्ट्रोक मारला आहे.
बोरोसिलची कमाल
सोलर ग्लास(Solar Glass) तयार करणारी कंपनी बोरोसिल रिन्युएबल लिमिटेड (Borosil Renewables Ltd) या कंपनीच्या गुंतवणूकदारांना ही लॉटरी लागली आहे. गेल्या तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने 1100 टक्के परतावा दिला आहे. तीन वर्षांपूर्वी हा स्टॉक 37 रुपये होता. आता त्याची किंमत 500 रुपयांच्या घरात आहे. बीएसईवर शुक्रवारी हा शेअर 3.12 टक्क्यांच्या तेजीसह 496 रुपयांवर बंद झाला. जर तीन वर्षांपूर्वी एखाद्याने या कंपनीत एक लाखांची गुंतवणूक करुन सोडून दिली असती तर आज त्याचे मूल्य 12.96 लाख रुपये इतके असते. या तीन वर्षांत हा स्टॉक 88.17 टक्के चढला आहे.
37 रुपयांहून 490 रुपयांची भरारी
हा मिडकॅप शेअर 17 एप्रिल 2020 रोजी बीएसईवर 37.55 रुपये होता. शुक्रवारी हा शेअर 496 रुपयांवर बंद झाला. या दरम्यान या शेअरमध्ये 1196 टक्क्यांची रॅली दिसली. या स्टॉकने 25 एप्रिल 2022 रोजी त्याचा 52 आठवड्यातील उच्चांक 833 रुपये गाठला होता. तर 28 मार्च 2023 रोजी या स्टॉकचा 52 आठवड्यातील निच्चांक 380.05 रुपये होता.
एका वर्षात इतकी घसरण
टेक्निकल टर्ममध्ये स्टॉकची रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (RSI), हा इंडेक्स ओव्हरबॉट झोन आणि ओव्हरसोल्ड झोनबाबत माहिती देतो. तर या स्टॉकचा आरएसआय हा 53.6 होता. शुक्रवारी हा शेअर 5, 20, 50 दिवसांच्या चलन सरासरीपेक्षा जास्त आहे. परंतु, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मुव्हिंग एव्हरेजपेक्षा ही कंपनी कमी व्यापार, उलाढाल करत आहे. एका वर्षात हा स्टॉक 29.06 टक्के घसरला आहे. तर या वर्षी या शेअरमध्ये 6.7 टक्क्यांची घसरण झाली आहे.
प्रमोटर्सकडे किती वाटा
मार्च 2023 च्या अंतिम तिमाहीत 12 प्रमोटर्सच्या फर्मकडे 61.62 टक्के वाटा आहे. तर 2.68 लाख सर्वसामान्य शेअरधारकांकडे या कंपनीचा 38.38 टक्के वा 5 कोटी शेअर आहेत. यामध्ये 2.62 लाख पब्लिक शेअरहोल्डर्सकडे 3.33 कोटी शेअर वा 25.55 टक्के वाटा आहे. या कंपनीत दोन शेअरधारकांकडे 0.87 टक्के म्हणजे 2 लाख रुपयांपेक्षा अधिकचे शेअर आहेत. ही कंपनी सोलर ग्लास आणि इतर उत्पादने 50 हून अधिक देशात विक्री करते.