चालू आर्थिक वर्ष 2023-24 संपण्यासाठी आता अवघा आठवडा उरला आहे. या कालावधीत सोन्याने गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. महागाई दरापेक्षा दुप्पट म्हणजे जवळपास 11 टक्क्यांचा तगडा सोन्यावाणी परतावा मिळाला आहे. जागतिक बाजारात सोने आणि चांदीने त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा चांगला परतावा दिला आहे. चालू आर्थिक वर्षात सोन्याच्या किंमतींनी 10 टक्के तर चांदीने 1.8 टक्क्यांचा परतावा दिला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) अंदाजानुसार, चालू आर्थिक वर्षात किरकोळ महागाई 5.4 टक्के होती.
सोन्यासाठी नव्हते हे वर्ष खास
परताव्याबाबतीत सध्याचे आर्थिक वर्ष सोन्यासाठी चांगले नव्हते. सोन्याने गेल्या दोन आर्थिक वर्षांत त्यापेक्षा जोरदार परतावा दिला आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये सोन्याने 15.2 टक्क्यांचा रिर्टन दिला होता. आर्थिक वर्ष 2022 मध्ये सोन्याच्या किंमतीत 15.6 टक्क्यांची वाढ दिसून आली. आर्थिक वर्ष 2012 पासून सोन्याच्या परताव्यावर नजर टाकता वायदे बाजारात (MCX) सोन्याने आर्थिक वर्ष 2021मध्ये सर्वाधिक परतावा दिल्याचे दिसून येते. या वर्षात सोन्याच्या किंमतीत 36.3 टक्क्यांची वाढ दिसून आली. त्यानंतर आर्थिक वर्ष 2020 मध्ये सोन्याने 35.5 टक्क्यांचा परतावा दिला होता. या तीन आर्थिक वर्षात सोन्यात केलेली गुंतवणूक तोट्याची ठरली होती. गुंतवणूकदारांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. सर्वाधिक नुकसान आर्थिक वर्ष 2015 मध्ये झाले होते. त्यावेळी किंमतीत 8.2 टक्क्यांची घसरण दिसून आली.
चांदीची कामगिरी काय
चांदीने पण कोरोना काळातच आर्थिक वर्ष 2021 मध्ये सर्वाधिक 61.5 रिटर्न दिला होता. त्यापूर्वी आर्थिक वर्ष 2017 मध्ये 15.2 टक्के परतावा मिळाला होता. आर्थिक वर्ष 2012 ते 2024 दरम्यान, वायदे बाजारात (MCX) चांदीने सातवेळा जोरदार परतावा दिला. तर उर्वरीत
6 वेळा नुकसान केले. गुंतवणूकदारांना आर्थिक वर्ष 2015 मध्ये 13.2 टक्क्यांचे नुकसान सहन करावे लागले होते. कॉमेक्स चांदीने केवळ 4 वेळा जोरदार परतावा दिला. यामध्ये आर्थिक वर्ष 2021 मध्ये 74.7 टक्क्यांचा परतावा सर्वात जास्त आहे. आर्थिक वर्ष 2014 मध्ये कॉमेक्स चांदीच्या किंमतीत 30 टक्क्यांहून अधिकची घसरण झाली होती.
मार्च महिन्यात सर्वकालीन उच्चांक
मार्च महिन्यात सोन्याने वायदे बाजारात सर्वकालीन उच्चांक गाठला होता. MCX च्या आकड्यांनुसार, सोन्याचा भाव 21 मार्च रोजी 66,943 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले होते. गेल्या आठवड्यातील शेवटच्या व्यापारी सत्रात सोन्याचा भाव 65,858 रुपयांवर बंद झाला. म्हणजे सोन्याचा भाव त्याच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा जवळपास 1100 रुपयांनी स्वस्त झाले आहे. या महिन्यात सोन्याच्या भावात 5 टक्क्यांची वाढ दिसून आली. तर वर्षभरात सोन्याच्या किंमतीत 3.66 टक्क्यांची वाढ दिसून आली.
तज्ज्ञांचे मत काय
एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटी आणि करन्सी हेड अनुज गुप्ता यांनी घडामोडींवर प्रकाश टाकला. त्यानुसार, येत्या 12 महिन्यात वायदे बाजारात सोने 67,000-67,500 रुपयांदरम्यान असेल. तर कॉमेक्सवर सोन्याची किंमत 2,250-2,300 डॉलरवर असेल. तर चांदी येत्या काळात 27 डॉलरपेक्षा झेप घेण्याची शक्यता आहे.