शुक्रवारी आणि या आठवड्याच्या अखेरीच्या सत्रात शेअर बाजाराने गुंतवणूकदारांची घोर निराशा केली. दिवाळीपूर्वी कमाई करण्याच्या प्रयत्नावर पाणी फेरले गेले. शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. बाजाराच्या या रौद्ररूपात ही या कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले. मेगास्टार अमिताभ बच्चन या कंपनीचे फॅन आहेत. शेव, बुंदी, मिठाई असे पॅकबंद स्नॅक्स विकणाऱ्या या कंपनीचा स्टॉक आज 10 टक्क्यांनी पळाला. गुंतवणूकदारांना हा आश्चर्याचा धक्का होता. एकीकडे बाजारात तडाखेबंद विक्री होत असताना दुसरीकडे हा स्टॉक सुसाट धावला. त्याने गुंतवणूकदारांना कमाई करून दिली.
बिकाजी फूड्सने केली कमाल
शेव, बुंदी, भुजिया, मिठाई, वेस्टर्न स्नॅक्स या सह अनेक प्रकारात तोंडाला पाणी सुटणाऱ्या खाद्यपदार्थांची निर्मिती बिकाजी फूड्स करते. या कंपनीचा बीकाजी फूड्स इंटरनॅशनलचा शेअर आज 10 टक्के तेजीत दिसला. शेअरचा भाव 918 रुपयांवर पोहचला. आज व्यापारी सत्राच्या अखेरीस या शेअरमध्ये नफा वसूली सुरू झाली. हा शेअर नंतर 863.40 रुपयांवर आला. पण तोपर्यंत अनेकांनी कमाई केलेली होती. हा स्टॉक अजून लंबा पल्ला गाठण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
शेअरची बाजारातील कामगिरी
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हा शेअर 450.45 रुपयांवर होता. हा या शेअरचा 52 आठवड्यातील निच्चांक होता. तर सप्टेंबर 2024 मध्ये हा शेअर 1,005 रुपयांवर 52 आठवड्यातील उच्चांकावर होता. या वर्षात हा शेअर आतापर्यंत 60 टक्क्यांनी वधारला आहे. निफ्टीच्या 12 टक्के रिटर्नपेक्षा याचा परतावा अधिक आहे. गेल्या 12 महिन्यांचा विचार करता हा शेअर 85 टक्क्यांनी वधारला आहे. तर त्या तुलनेत निफ्टी 28 टक्के वधारला आहे.
या शेअरमध्ये उसळीचे कारण तरी काय?
Snack Maker कंपनीने सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. तिमाही दरम्यान कंपनीने वार्षिक आधारावर 14.7 फायद्याचे गणित जमवले. कंपनीचा नफा 86.6 कोटींच्या घरात आहे. या दरम्यान कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर 19 टक्क्यांनी वाढून 721.2 कोटी रुपयांवर पोहचला. बिकाजीचा एबिटा वार्षिक आधारावर 22 टक्क्यांनी वाढून 106.7 कोटी रुपयांवर पोहचला. तर एबिटा मार्जिन एका वर्षापूर्वीच्या 14.4 टक्क्यांहून 14.8 टक्के वाढला.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.