नवी दिल्ली : पाकिस्तान (Pakistan) सध्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. पण जगात ही नामुष्की केवळ पाकिस्तानवर आली आहे, असे नाही, तर जागतिक महासत्ता पण यातून सुटली नाही. अमेरिकेसमोर पाकिस्तानपेक्षा मोठं संकट उभं ठाकलं आहे. लवकरच उपाय केले नाही तर पाकिस्तान अगोदर अमेरिकेचे (America Debt) दिवाळं निघेल, असा दावा काही अर्थतज्ज्ञ आणि मीडिया हाऊसेस करत आहेत. अमेरिका सध्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे. अजून काही दिवसात या संकटावर तोडगा नाही काढला तर अमेरिका प्रशासनासमोर दिवाळखोरीशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही.
गौतम अदानी वरचढ
अमेरिकेवर कर्जाचे संकट (US Debt Ceiling Crisis) गडद झाले आहे. यावर तोडगा न निघाल्यास इतिहासात हा देश पहिल्यांदाच दिवाळखोर ठरेल. देशाकडे सध्या केवळ 57 अब्ज डॉलर रोख रक्कम आहे. तर भारतीय उद्योजक गौतम अदानी यांच्याकडे एकूण 64.2 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. अमेरिकेला दररोज व्याजापोटी 1.3 अब्ज डॉलर अदा करावे लागत आहेत.
शेअर बाजारात घमासान
या वाढत्या संकटाची चाहूल शेअर बाजाराला लागली. बाजाराने त्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिली. मंगळवारी अवघ्या चार तासांतच गुंतवणूकदारांचे 400 अब्ज डॉलर स्वाहा झाले. जर या आठवड्यात या संकटावर तोडगा निघाला नाही तर अमेरिका 1 जून रोजी दिवाळखोरीत जाऊ शकतो, असा इशारा अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट येलेन यांनी दिला आहे.
पाकिस्तानवर किती आहे कर्ज
स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने (SBP) यावर्षाच्या सुरुवातीला आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार, देशावर एकूण 55 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. तर पाकिस्तानचे पूर्व अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांनी यावर्षीच्या सुरुवातीला पाकिस्तानवर 100 अब्ज डॉलर कर्जाचा डोंगर आहे. आतापर्यंत पाकिस्तानला 10 अब्ज डॉलरची तजवीज करता आली आहे. पाकिस्तानची परदेशी चलनाचा साठी ही घसरत आहे.
दिवाळखोरी जाहीर झाली तर
जर अमेरिकेने दिवाळखोरी जाहीर केली तर त्याचे भयावह परिणाम होतील. व्हाईट हाऊसच्या अर्थतज्ज्ञानुसार, यामुळे अमेरिकतील 83 लाख नोकऱ्या धोक्यात येतील. अमेरिकन शेअर बाजाराला फटका बसेल. अमेरिकेचा आर्थिक विकास दर गडगडेल. आर्थिक मंदी येण्याची भीती असेल. अमेरिका संकटात आल्यावर जगभरात त्याचे परिणाम उमटतील.
तर हा उपाय
उधारी घेण्याची एक मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 1960 पासून ही मर्यादा 78 वेळा वाढविण्यात आली आहे. डिसेंबर 2021 मध्ये ही मर्यादा वाढवून 31.4 ट्रिलियन डॉलर करण्यात आली होती. त्यामुळे आता जर ही मर्यादा वाढवली आणि आर्थिक मदतीची घोषणा केली तरच हे संकट टळू शकते.