नवी दिल्ली : रशियावर (Russia) अमेरिकेसह पश्चिमी राष्ट्रांनी आर्थिक प्रतिबंध लादले आहेत. त्यामुळे रशिया भारताला स्वस्तात कच्चा तेलाचा पुरवठा करत आहे. अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदीला विरोध केला होता. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर एक वर्षांपासून हा भाग धुमसत आहे. अमेरिकेचा (America) दबाव झुगारुन भारताने स्वस्तात इंधन मिळत असल्याने ते खरेदी करत असल्याचा दावा केला. स्वस्तात कच्चे तेल (Import Crude Oil) खरेदी केल्याने भारत-रशियातील व्यापार वाढला आहे. पण त्याचा भारताला काहीच उपयोग झाला नसल्याचे आकडेवारीवरुन दिसून आले. चीनसोबतच्या व्यापारात जसा भारताला तोटा झाला, तसाच फटका रशियासोबतच्या व्यापारातून झाला.
कसा बसला फटका
व्यापार हा दोन्ही देशांमध्ये समतोल साधणारा असेल तर दोन्ही देशांना फायदेशीर ठरतो. पण एकाच देशाकडून माला खरेदी होत असेल आणि त्या देशात या देशाच्या सामानाची विक्री होत नसेल तर मग खरेदी करणाऱ्या देशाला फटका बसतो. भारतासोबत नेमकं हेच घडलं आहे. चीनकडून भारत मोठ्या प्रमाणात आयात करतो. पण चीन भारताकडून फार कमी वस्तू खरेदी करतो. रशियाने पण हेच धोरण राबविले. भारताला मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल विक्री केले. पण भारताकडून कमी वस्तू आयात केल्या.
किती झाला तोटा
रशियासोबत भारताचा व्यापारी तोटा सात पटीने वाढला आहे. हा तोटा 34.79 अब्ज डॉलरवर पोहचला आहे. कोणत्याही देशासाठी व्यापार संतुलन अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक देशाला वाटते की व्यापारातील तोटा कमी असावा. कारण त्यामुळे अर्थव्यवस्था प्रभावित होते. स्वस्तात इंधन मिळत असल्याने आणि भारताला गरज असल्याने भारताने कच्चा तेलाची आयात केली. पण भारत रशियात त्याच प्रमाणात मालाची विक्री करु शकला नाही, इथंच नेमकं गणित फिसकटलं.
तेल आयात मूळ कारण
रशियासोबत भारताला जो विक्रमी तोटा सहन करावा लागला, त्याचे मूळ कारण तेलाची बंपर आयात हे आहे. याविषयीची चिंता करण्याचे कारण म्हणजे भारताचा व्यापारी तोटा 101.02 अब्ज डॉलरच्या विक्रमी स्तरावर पोहचला आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होणार आहे.
आकडेवारी काय सांगते
डिपार्टमेंट ऑफ कॉमर्सच्या आकड्यांनुसार, एप्रिल 2022 ते जानेवारी 2023 या दरम्यान भारताला चीनसोबतच्या व्यापारात सर्वाधिक फटका बसला. या व्यापारामधून भारताला 71.58 अब्ज डॉलरचा तोटा झाला. तर रशियासोबत व्यापारी तोटा 34.79 अब्ज डॉलर होता. आर्थिक वर्ष 2021-22 या काळात रशियासोबतचा व्यापारी तोटा सात पटीने वाढला आहे.