Edible Oil Price : चिंताच नको, खाद्य तेल नाही महागणार, अशी होणार जादू

| Updated on: Sep 08, 2023 | 8:50 PM

Edible Oil Price : काही भागात मुसळधार पावसाने तर काही ठिकाणी पावसाने डोळे वटारल्याने सोयाबीन, शेंगदाणे आणि सूर्यफुलाच्या शेतीला मोठा फटका बसला. त्यामुळे यंदा उत्पादन घसरण्याची दाट शक्यता आहे. भारताने एका वर्षात रेकॉर्ड 1.41 लाख कोटी खाद्यतेलाची आयात केली आहे.

Edible Oil Price : चिंताच नको, खाद्य तेल नाही महागणार, अशी होणार जादू
Follow us on

नवी दिल्ली | 8 सप्टेंबर 2023 : देशात गेल्या महिन्यात पावसाने मोठा ब्रेक घेतला. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. अनेक पीकं होरपळली. तर काही ठिकाणी दुबार पेरणी करुनही हाती काही लागेल याची शक्यता कमीच आहे. या वातावरणाचा सर्वाधिक फटका तेलबिया पिकांना (Edible Oil Seeds Production) बसला आहे. देशात सोयाबीन, शेंगदाणे आणि सूर्यफुलाचे उत्पादन घसरण्याची शक्यता आहे. सध्या खाद्यतेलाच्या किंमती अटोक्यात आणि स्थिर आहेत. महागाईत (Inflation) अजूनही खाद्यतेलाने कोणतीच भर टाकलेली नाही. आता सणाचा हंगाम सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर खाद्यतेल (Edible Oil Price) आटोक्यात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने आतापासूनच कंबर कसली आहे. त्यासाठी ही उपाय योजना करण्यात येत आहे.

सोयाबीनचे उत्पादन घसरणार

अखिल भारतीय खाद्य तेल व्यापारी महासंघाने उत्पादनाबाबत चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात पावसाने ओढ दिली आहे. मोठा गॅप पडल्याने अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे मोठे संकट ओढावले आहे. खाद्यतेलामध्ये सोयाबीनचा वाटा 18 टक्क्यांच्या घरात आहे. महासंघाचे अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी शेंगदाणा उत्पादन घटण्याची शक्यता नोंदवली आहे. त्यांच्या मते, गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.63 लाख हेक्टर उत्पादन घसरेल. गेल्या वर्षीपेक्षा 1.29 लाख हेक्टरवर सूर्यफुलाचा कमी पेरा झाला आहे. या सर्वांचा फटका तेल उत्पादनावर पडू शकतो.

हे सुद्धा वाचा

आता खाद्यतेल आयातीवर भर

ठक्कर यांच्या मते, 31 ऑक्टोबर संपायला आता एक महिना बाकी आहे. गेल्या वर्षभराचा विचार करता भारताने रेकॉर्ड 1.41 लाख कोटी खाद्यतेलाची आयात केली आहे. ही आयात 26 टक्के अधिक आहे. खाद्यतेलाच्या आयातीत 8.2 दशलक्ष टन पामतेल, 3.2 दशलक्ष टन सोया तेल आणि 2.5 दशलक्ष टन सूर्यफुल तेलाचा समावेश आहे.

सूर्यफुलाच्या तेलाची आयात वाढेल

यंदा भारत त्याच्या गरजेच्या दोन तृतीयांश खाद्यतेलाची आयात करु शकतो. देशातंर्गत उत्पादनात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात आयात होण्याची शक्यता आहे. सध्या जागतिक बाजारात सूर्यफुलाचे भाव किफायतशीर आहे. त्याचा केंद्र सरकार फायदा घेण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 44 टक्के अधिक सूर्यफुल तेल आयात करण्यात येईल. रेकॉर्ड 2.8 दशलक्ष टन सूर्यफुल तेल आयात होऊ शकते.


या देशातून खाद्य तेलाची आयात

भारत मुख्यतः इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडमधून पाम तेल खरेदी करते. तर अर्जेंटिना, ब्राझिल, रशिया आणि युक्रेनमधून सोयबीन आणि सूर्यफुल तेलाची आयात करतो. भारताने एका वर्षांतच रेकॉर्ड 1.41 लाख कोटी रुपयांच्या खाद्यतेलाची आयात केली. तर 2020 मध्ये देशाने केवळ 70 हजार कोटी रुपयांच्या खाद्यतेलाची आयात केली होती.