नवी दिल्ली : यंदाचे वर्ष शेअर बाजारात चढ-उताराचे राहिले. इक्विटी गुंतवणूकदारांना (Equity Investors) नफ्यापेक्षा नुकसानीच्याच चिंतेने सतावले. महागाईमुळे जग बेजार झाले. महागाई थोपविण्यासाठी प्रत्येक केंद्रीय बँकेने व्याजदर वाढीचा सपाटा लावला. त्याचा परिणाम शेअर बाजार, सोने-चांदी आणि इंधनाच्या दरावर दिसून आला. केंद्रीय बँकांच्या भूमिकेमुळे शेअर बाजारात घसरणीचे सत्र (Share Market Fall) कायम राहिले. गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. परंतु, अशाही परिस्थितीत काही शेअर्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केले. यातील काही शेअरचे नाव सुद्धा सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या गावी नाही.
बाजारातील गुंतवणूकदारांना फारसे परिचीत नसलेले नाव म्हणजे हेमांग रिसोर्सज लिमिटेड (Hemang Resources Ltd) कंपनीचे आहे. 2022 मध्ये हा स्टॉक सर्वाधिक मल्टिबॅगर स्टॉक ठरला. या कंपनीने वर्षभरातच गुंतवणूकदारांना कोट्यधीश केले. ज्यांनी गुंतवणूक केली. त्यांना जबरदस्त परतावा मिळाला.
हेमांग रिसोर्सेज लिमिटेड ही कंपनी पूर्वी भाटिया इंडस्ट्रीज आणि इंफ्रास्टक्चर लिमिटेड या नावाने ओळखल्या जात होती. या शेअरमध्ये यंदा 2,112 टक्क्यांहून अधिकची वृद्धी दिसून आली. त्यामुळे गुंतवणूकदारांना कमी गुंतवणुकीत जास्त परतावा मिळाला.
या वर्षाच्या सुरुवातीला हा शेअर 3 रुपये होता. त्यानंतर आता या शेअरची किंमत 66.35 रुपये झाली आहे. ही कंपनी कोळसा आणि पायाभूत सोयी-सुविधा पुरवते. ही कंपनी आयात आणि देशांतर्गत कोळशाचा व्यापार करते. जमिनीची खरेदी-विक्री आणि लॉजिस्टिक सेवा पुरवते.
या कंपनीच्या नफ्यात यंदा चांगला फायदा दिसून आला. सप्टेंबर 2022 मध्ये सहा महिन्यात कंपनीचा महसूल 155.53 कोटी रुपये होता. तर कंपनीला 19.52 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. परंतु, आर्थिक वर्ष 2022 मधील एप्रिल-सप्टेंबर महिन्यात या कंपनीचा महसूल शुन्य रुपये होता. तर कंपनीला 5 लाख रुपयांचा तोटा झाला होता.
पण आर्थिक वर्ष 2022-2023 मध्ये या कंपनीचे नशीब पालटले. गेल्या दोन वर्षांत अनेक राज्यात विजेचे संकट उभे ठाकले होते. परिणामी विदेशातून कोळसा आयात करण्यात आला. त्यामुळे या कंपनीचा व्यापारात प्रचंड वृद्धी झाली आणि कंपनीचा महसूलही वाढला. त्याचा फायदा कंपनीला झाला.
संसंदेत 7 डिसेंबर रोजी एक अहवाल सादर करण्यात आला. एप्रिल-ऑक्टोबर या दरम्यान ऊर्जा क्षेत्रात कोळशाची आयात 38.84 दशलक्ष टन झाली. विश्लेषकांच्या अंदाजानुसार, भारतात आयात कोळशात वृद्धी होईल. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत आयातीत 35 टक्क्यांची वाढ झाली.
हेमांग रिसोर्सेज या कंपनीची मुळात 1993 साली स्थापना झाली होती. बीसीसी हाऊसिंग फायनान्स आणि लिजिंग कंपनी लिमिटेड नावाने ही नॉन बँकिंग फायनान्स कंपनी होती. त्यानंतर पुढे तीनदा या कंपनीचे नाव बदलण्यात आले.