नवी दिल्ली : फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत (Forbes Rich List) जगभरातील अनेक दिग्गजांनी स्थान पटकावले आहे. यावर्षातील, 2023 मधील यादी जाहीर केली. भारतीय श्रीमंतांमध्ये पहिला क्रमांक रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा आहे. ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहे. फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत इतर ही अनेक भारतीय आहेत. कधी काळी या यादीत झपाझप पायऱ्या चढणारे मुकेश अंबानी (Mukesh Ambani) टॉप-30 मध्ये आहेत. या यादीत एका भारतीय तरुणांने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. अवघ्या 36 वर्षाच्या या युवकाने देशातील तरुणांसमोर स्वतःची प्रेरणादायी कहाणी मांडली. अवघ्या 8 हजार रुपयांवर काम करणाऱ्या या तरुणाने मोठी झेप घेतली. आज तो फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत तरुण भारतीय अब्जाधीश आहे.
36 व्या वर्षी केली कमाल
फोर्ब्सच्या मते, शेअर बाजाराशी संबंधीत ॲप झिरोधा सर्वांनाच परिचीत आहे. यामाध्यमातून अनेक गुंतवणूकदार दररोज कोट्यवधींचा व्यवहार करतात, ट्रेड करतात. या झिरोधाचे सहसंस्थापक निखील कामात आहेत. त्यांनी भावासोबत हे बिझनेस मॉडल विकसीत केले. बंगळुरु स्थित या दोन भावांची एकूण संपत्ती क्रमशः 1.1 आणि 2.7 अब्ज डॉलर आहे. स्कूल ड्रॉपआऊट ते अब्जाधीशांपर्यंतचा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. कष्टाच्या, मेहनतीच्या जोरावर निखील कामत यांनी हा पल्ला गाठला आहे.
कॉल सेंटरममध्ये केली नोकरी
निखील कामथ यांनी Humans of Bombay ला एक मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी त्यांच्या आयुष्याचा पट मांडला होता. शाळा लवकर सोडल्यानंतर त्यांनी 17 व्या वर्षी पहिली नोकरी केली. कॉल सेंटरमध्ये ते रुजू झाले. त्यावेळी त्यांचा पगार केवळ 8000 रुपये होता. त्यानंतर त्यांनी शेअर बाजारात त्यांच्या करिअरची सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात त्यांनी हे काम फार गांभीर्याने केले नाही. पण बाजाराची दिशा आणि दशा लक्षात आल्यानंतर त्यांनी शेअर ट्रेडिंगवर लक्ष केंद्रीत केले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
वडिलांचा आर्थिक आधार
या मुलाखतीत निखील कामथ यांनी त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांचे अनुभव शेअर केले. त्यानुसार, त्यांच्या वडिलांना सुरुवातीच्या काळात खूप मदत केली. त्यांची बचत त्यांनी निखील यांना दिली. त्यामुळेच त्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करता आली. वडिलांनी त्यांच्यावर विश्वास तर टाकलाच पण त्यांना प्रोत्साहन पण दिले. त्यांना बाजारातील बारीकसारीक गोष्टी शिकता आल्या. त्यानंतर त्यांनी नोकरीवर जाणं बंद केले. त्यानंतर झिरोधाची सुरुवात झाली.
झिरोधाची सुरुवात
2010 साली दोन्ही भावांनी मिळून झिरोधाची स्थापना केली. हा ब्रँड उभा करताना त्यांनी खूप मेहनत घेतली. आज जरी अब्जाधीश झालो असलो तरी आजही तेवढाच वेळ काम करत असल्याचा दावा त्यांनी केला.