नवी दिल्ली | 4 ऑक्टोबर 2023 : भारतात मंदीची झळ जाणवत नसली तरी जगात अनेक कंपन्यांना या मंदीचे चटके सहन करावे लागत आहे. गुगल, फेसबुकसह (Google, Facebook) अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात, खर्चात कपात अशी काही धोरणं स्वीकारली आहेत. तर भारतातील काही स्टार्टअप्सने हाच कित्ता गिरवला आहे. त्यांनी अनेक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. अशा वातावरणात अमेरिकेतील एका कंपनीच्या सीईओने (Indian CEO) कर्मचाऱ्यांसाठी जे केले, त्यामुळे तो हिरो ठरला आहे. त्याच्या या निर्णयाने जागतिक कंपन्या, त्यांची धोरणं ठरवणाऱ्या सीईओ, मालकांच्या डोळ्यात एक झणझणीत अंजन घातले आहे. कर्मचाऱ्यांना मंदीच्या स्थितीचा सामना करता यावा यासाठी या भारतीय बॉसने घेतल्या निर्णयाचे जगभरात कौतूक होत आहे.
काय घेतला निर्णय
सतीश मल्होत्रा (Satish Malhotra) यांनी 2021 मध्ये अमेरिकन कंपनी The Container Store च्या सीईओ पदाची सूत्र हाती घेतली. त्यानंतर सध्या मंदीचा फेरा आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न उभा ठाकला आहे. पण मल्होत्रा यांनी त्यावर मार्ग शोधला. तर कर्मचाऱ्यांचा अशा परिस्थिती पण पगार वाढावा यासाठी मल्होत्रा यांनी त्यांच्या पगारात 10 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. कंपनीची विक्री घसरली आहे. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना पगार वाढ मिळावी यासाठी त्यांनी स्वतःचा पगार कमी करण्याचा निर्णय घेतला. या 1 ऑक्टोबरपासून पुढील सहा महिने ते कमी वेतन घेतील. त्यामुळे त्यांचे वार्षिक वेतन 9,25,000 डॉलरवरुन 8,32,500 डॉलरवर येणार आहे.
संकट काळात कर्मचाऱ्यांसोबत
सध्या अनेक जागतिक कंपन्या संकटातून जात आहेत. पण व्यवस्थापन दयामाया दाखवताना दिसत नाही. कर्मचारी भरती करताना आमिषं दाखवणारे व्यवस्थापन नंतर हात वर करते. कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवते. पण भारतीय सीईओ सतीश मल्होत्रा यांच्या या निर्णयाने अनेक कंपन्यांना आदर्श मिळाला आहे. अमेरिकेतच नाही तर जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हे कर्मचारी अनेक दिवसांपासून काम करत असताना, मल्होत्रा यांनी त्यांची साथ सोडली नाही. उलट वेतनात कपात करत त्यांचा पगार वाढविण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. त्यांनी मल्होत्रा यांना डोक्यावर घेतले आहे.