नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यात गेल्या काही दिवसांपासून पारा वाढला आहे. सूर्य आकाशातून आग (Heat Wave) ओकतोय. त्यामुळे देशात विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. आता वाढती मागणी पूर्ण करण्याचे संकट केंद्र सरकारवर आले आहे. देशातील उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, महाराष्ट्रासह एकूण 9 राज्यात उष्णतेची लाट आणि ढगाळ वातावरणामुळे दमट वातावरण आहे. राज्यातील अनेक शहरात तापमान 40 डिग्री सेल्सिअसच्याही पुढे पोहचले आहे. त्यामुळे विजेची मागणी (Consumption of Electricity) वाढली आहे. राज्यातील काही भागात विजेचे संकट (Power Cut) ओढावले आहे. काही तासांसाठी वीज बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. देशातील काही भागात तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्चपेक्षा एप्रिल महिन्यात विजेची मागणी दुप्पट झाली आहे.
शहरात विजेच्या मागणीत वाढ
ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. शहरात एअर कंडिशनर, पंखे, कुलर यासाठी मोठ्या प्रमाणात विचेजा वापर वाढला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात विजेचा वापर वाढला आहे. केरळमध्ये विजेचा दैनंदिन वापर 17 एप्रिल रोजी 10 कोटी 35 लाख युनिटवर पोहचला. युपी, बिहार आणि महाराष्ट्रातही विजेचा वापर वाढला आहे.
पारा वाढल्याने वीज संकट
ऊर्जा मंत्रालयाने याविषयीची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, आर्थिक घडामोडी वाढल्याने देशात वार्षिक आधारावर, आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये विजेचा वापर 9.5 टक्के वाढला. विजेचा खप 1,503.65 अब्ज युनिट्सवर पोहचला. सरकारी आकड्यानुसार, 2021-22 मध्ये 1,374 अब्ज युनिट वापर झाला. केंद्रीय इलेक्ट्रिसिटी प्राधिकरणाच्या दाव्यानुसार, 2022-23 मध्ये एका दिवशी 207.23 गिगावॅट इतकी सर्वाधिक विजेची मागणी नोंदविण्यात आली.
मोदी सरकारची योजना
यंदा विजेची मागणी जास्त वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन मोदी सरकारने उपाय योजना सुरु केली आहे. तज्ज्ञांनी यंदा विजेची मागणी अधिक असल्याचा अंदाज यापूर्वीच वर्तवला होता. तेव्हापासून ऊर्जा मंत्रालयाने उपाय योजना सुरु केल्या. ऊर्जा मंत्रालयाच्या अंदाजानुसार, ही मागणी एका दिवसात 229 गिगावॅटपर्यंत पोहचू शकते. त्यासाठी मंत्रालयाने कोळशावर आधारीत वीज उत्पादन युनिट पूर्ण क्षमतेने चालविण्याचे निर्देश दिले आहेत.
ग्रामीण भागात बत्ती गूल
देशात सध्या उष्णतेची लाट आली आहे. सूर्य देव कोपला आहे. त्यामुळे अनेक भागात विजेचा वापर वाढला आहे. त्यामुळे वितरणावर ताण येत आहे. युपी, बिहार, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उडीशा आणि झारखंड राज्यात विजेच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. वीज वितरण कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, प्रत्येक भागात विजेचा पुरवठा सुरळीत आहे. विद्युत पुरवठा खंडीत झाल्याच्या तक्रारी येत असल्या तरी तो तांत्रिक दोष असल्याचा दावा वीज वितरण कंपन्यांनी केला आहे.