नवी दिल्ली : जगभरात भारताचा डंका वाजत आहे. विकासाच्या वाटेवर भारताने दरमजल न करता मोठी झेप घेतली आहे. भारतीय अर्थव्यवस्था दोन पंचवार्षिकपासून मोठे आश्वासक पाऊल टाकत आहे. भारतीय अर्थव्यवस्था जोमात आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी विकास गंगेची माहिती दिली. त्यानुसार सकल देशातंर्गत उत्पादनात (GDP) भारताने या 9 वर्षांत मोठी भरारी घेतली आहे. 2014 मध्ये GDP 2 लाख कोटी डॉलर होती. आता भारतीय अर्थव्यवस्था 3.75 लाख कोटी डॉलरवर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे अनेक मोठ्या अर्थव्यवस्थांना भारतीय अर्थव्यवस्थेने धोबीपछाड दिली आहे.
अशी घेतली भरारी
महागाई आणि इतर संकटांमुळे जागतिक अर्थव्यवस्थांना हादरे बसत असताना भारतीय अर्थव्यवस्थेने मात्र मोठी झेप घेतली आहे. भारतीय अर्थव्यवस्था 10 व्या स्थानावरुन थेट 5 व्या स्थानावर येऊन ठेपली आहे. कधीकाळी भारतावर राज्य गाजविणाऱ्या गोऱ्या साहेबांच्या देशाला भारताने मागे टाकले आहे.
इंग्लंडला धोबीपछाड
IMF च्या दाव्यानुसार, भारत गेल्या वर्षीच ब्रिटेनला मागे टाकत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाली आहे. जीडीपीच्या बाबतीत भारतापुढे केवळ चारच अर्थव्यवस्था आहेत. यामध्ये अमेरिका, चीन, जापान आणि जर्मनी यांचा समावेश आहे.भारत आता जगातील ब्राईट स्पॉट म्हणून सर्वात मोठा पुढे आला आहे, असा दावा केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण यांनी केला आहे.
जास्त निर्यातीमुळे GDP मध्ये मोठी वाढ
राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालयाने (NSO) नुकतीच एक आकडेवारी समोर आणली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथी तिमाहीत फॅक्टर कॉस्टवर भारताची GDP (real GDP) 6.1 टक्के वाढली आहे. आर्थिक वर्षात विकास दर 7.2 टक्के ठेवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात यश आले आहे. गेल्या आठवड्यात आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी भारतीय अर्थव्यवस्था आणि आर्थिक क्षेत्रात वेग असल्याचे संकेत दिले होते. आर्थिक वर्ष 2023-24 साठी रिअल जीडीपी वृद्धी 6.5 टक्के अंदाज वर्तविण्यात आला आहे.
चीनची आगेकूच
वर्ष 2019 आणि 2020 या काळात चीनने भारतापेक्षा चांगले प्रदर्शन केले आहे. 2019 मध्ये चीनचा आर्थिक वृद्धी दर 6 टक्के तर भारताचा वृद्धी दर 3.9 टक्के होता. कोविडपूर्व काळात चीनच्या आर्थिक वृद्धीत 2.2 टक्के तर भारताच्या वृद्धी दरात 5.8 टक्के कमी आली. 2014 ते 2022 या 9 वर्षांत चीनने सरासरी 6 टक्क्यांपेक्षा अधिकचा वृद्धी दर गाठला आहे. तर याच काळात भारताचा जीडीपी 5.7 टक्के होता. पण कोविडच्या एका वर्षा अगोदरपासून भारतीय अर्थव्यवस्थेने चीनपेक्षा अधिक आघाडी घेतल्याचे समोर येते.