यंदा भारतात कडक उन्हाळ्याने सर्वांनाच भाजून काढले. उत्तर भारतात तर सध्या उकाड्याने नागरीक हैराण आहेत. अनेक शहरात तापमानाने कमाल पातळी ओलांडली आहे. त्याचा थेट परिणाम भाजीपाला आणि फळ पिकांवर पडलेला दिसून येतो. तर देशातील अनेक भागात सुरुवातीला दमदार पाऊस झाल्यानंतर आता त्याने ओढ दिली आहे. त्यामुळे देशातील बाजारपेठेत भाज्यांची आवक रोडावली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचा भाव कडाडले आहेत. मुंबईसह महाराष्ट्र आणि इतर राज्यात टोमॅटो आताच 100 रुपयांच्या घरात पोहचला आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पण टोमॅटोचा भाव 90 ते 95 रुपये प्रति किलोवर पोहचला आहे. महाराष्ट्रासह तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात टोमॅटोच्या किंमती 80 ते 100 रुपये प्रति किलोदरम्यान आहेत.
पावसाळ्यात कमी-जास्त होतो भाव
प्रत्येक वर्षी पावसाळ्यात भाजीपाल्याच्या किंमतीत वाढ होते. जोरदार पाऊस अथवा कमी पावसाचा थेट परिणाम भाजीपाला उत्पादनावर दिसून येतो. देशभरात सध्या उन्हाचा कहर सुरु आहे. भाजीपाला उत्पादन घटले आहे. तर ज्या भागात पाऊस पडला आहे. तिथे वाहतूक आणि साठवणीच्या अडचणीमुळे भाजीपाला सडण्याची भीती असते. त्याचा परिणाम भाजीपाल्यांच्या किंमतींवर दिसून येतो.
चार पट अधिक लागवड, पण उत्पादन कमी
गेल्यावर्षी टोमॅटोने शेतकऱ्यांना लखपती आणि करोडपती केले होते. यावर्षी टोमॅटो उत्पादनात अधिक शेतकरी उतरले आहेत. गेल्यावर्षीपेक्षा चार पट अधिक लागवड झाली आहे. पण उत्पादनाला पाऊस आणि उन्हाचा फटका बसला आहे. CNBC TV 18 च्या वृत्तानुसार, महाराष्ट्रातील अनेक भागात यंदा गेल्या वर्षीपेक्षा चार पट अधिक टोमॅटोची लागवड करण्यात आली. पण उन्हाळा आणि पावसाने ओढ दिल्याने उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ शकले नाही. जुन्नर तालुक्यात प्रत्येक वर्षी जवळपास 2000 कार्टन प्रति एकर टोमॅटो उत्पादन होते. यंदा हे प्रमाण 500 से 600 कार्टन प्रति एकरवर आले आहे. हीच स्थिती अनेक भागात आहे.
सध्या तरी किंमती कमी होण्याची शक्यता कमीच
टोमॅटोच्या किंमतींमध्ये जनतेला कोणताच दिलासा मिळण्याची शक्यता नाही. मान्सूनमध्ये ग्राहकांच्या खिशावर ताण आल्याशिवाय राहत नाही. मान्सूनने डोळे वटारल्याने शेतकऱ्यांसह सरकारची चिंता वाढली आहे. मान्सूनला अजून उशीर झाल्यास खरीपाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होईल. भाजीपाल्याच्या किंमती वाढतील. त्यामुळे सरकारला अगोदरच उपाय योजना करण्याशिवाय गत्यंतर नाही.