मुंबई : भारतीय अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरची करण्यासाठी धोरण आखण्यात आलंय. त्यादृष्टीने केंद्रीय अर्थसंकल्पात अनेक उद्दीष्ट समोर ठेवण्यात आली आहेत. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमधील ओसाका येथे झालेल्या G-20 परिषदेतही भारत 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्यासाठी वेगाने वाटचाल करत असल्याचं म्हटलं होतं. लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात चीननंतर दुसरा क्रमांक लागतो. पण अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आतापर्यंत लोकसंख्येला आवश्यक अशी वाढ होऊ शकली नाही. 5 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेसाठी विकास दर 8 टक्क्यांवर ठेवावा लागेल, असं आर्थिक सर्वेक्षणात म्हटलंय. पण जगाच्या तुलनेत भारत सध्या कुठे आहे ते पाहणंही महत्त्वाचं ठरतं.
आर्थिक महासत्ता म्हणून अमेरिकेचा कायम पहिला नंबर राहिलाय. त्यानंतर चीनचा नंबर लागतो. जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा सध्या सहावा क्रमांक लागतो. भारत पाचव्या क्रमांकावर असलेल्या ब्रिटनला लवकरच मागे टाकण्याची शक्यता आहे. ‘फोकस इकॉनॉमिक्स’नुसार भारत सध्या जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. पण 5 ट्रिलियन क्लब गाठण्यासाठी अजून मोठा मार्ग पार करावा लागणार आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेत कुणाचा कितवा क्रमांक? (Nominal GDP नुसार)
अमेरिका – 21.506 ट्रिलियन डॉलर
चीन – 14.242 ट्रिलियन डॉलर
जपान – 5.231 ट्रिलियन डॉलर
जर्मनी – 4.210 ट्रिलियन डॉलर
ब्रिटन – 2.982 ट्रिलियन डॉलर
भारत – 2.935 ट्रिलियन डॉलर
फ्रान्स – 2.934 ट्रिलियन डॉलर
इटली – 2.161 ट्रिलियन डॉलर
ब्राझिल – 2.095 ट्रिलियन डॉलर
कॅनडा – 1.822 ट्रिलियन डॉलर
2019 मध्ये वाढीचा दर
अमेरिका – 2.5 टक्के
चीन – 6.3 टक्के
जपान – 1.1 टक्के
जर्मनी – 1.8 टक्के
ब्रिटन – 1.4 टक्के
भारत – 7.4 टक्के
फ्रान्स – 1.7 टक्के
इटली – 1.1 टक्के
ब्राझिल – 2.3 टक्के
कॅनडा – 2.0 टक्के
अमेरिकेचं निर्विवाद वर्चस्व, चीनचंही आव्हान
जागतिक महासत्ता म्हणून अमेरिकेचं वर्चस्व आजही कायम आहे. तंत्रज्ञान, आर्थिक सेवा आणि आरोग्य क्षेत्रामधील योगदानामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था कायम मजबूत राहते. जागतिक अर्थव्यवस्थेत हे स्थान कायम राखण्यासाठी अमेरिकेच्या कंपन्या मोठी भूमिका निभावतात. तर दुसरीकडे ट्रेड वॉरनंतरही चीनकडून अमेरिकेला आव्हान दिलं जातंय. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या चीनचा सध्या अर्थव्यवस्थांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.