नवी दिल्ली : आता भारतीय युझर्सला ट्विटरच्या (Twitter) ब्ल्यू टिकसाठी पैसे मोजावे लागणार आहे. तरच तुम्हाला ब्लू टिक (Blue Tick) शाबूत ठेवता येईल. जुन्या वापरकर्त्यांना ब्लू टिकसाठी रक्कम मोजावी लागेल. तर नवीन ग्राहकांना ही सेवा सशुल्क मिळेल. मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने भारतात या पेड सेवेसाठी नोंदणी सुरु केल्याची माहिती समोर येत आहे. भारतात Twitter Blue सेवेसाठी युझर्सला 650 रुपये प्रति महिना जमा करावा लागेल. तर वेबवर ट्विटरचा वापर करणाऱ्यांना 650 रुपये दरमहा, तर मोबाईल युझर्सला मात्र जादा रक्कम मोजावी लागेल. त्यांना 900 रुपये प्रति महिना शुल्क मोजावे लागेल.
एलॉन मस्कने ट्विटरसाठी नोंदणी शुल्क सुरु करण्याची घोषणा यापूर्वीच केली होती. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्युझीलँड आणि जपान या देशांसह इतर देशात ट्विटर ब्लू सशुल्क सेवा सुरु केली होती. या देशामध्ये ब्लू टिकच्या नोंदणीसाठी 8 डॉलर प्रति महा शुल्क निश्चित करण्यात आले होते.
वार्षिक नोंदणी शुल्काचीही घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार, वापरकर्त्यांना ब्लू टिकसाठी वार्षिक 84 डॉलर जमा करणे आवश्यक आहे. ट्विटरच्या म्हणण्यानुसार, 3 डॉलर जादा चार्ज लावून ही रक्कम ते गुगलला कमिशन म्हणून देणार आहेत. भारतात 6800 रुपये वार्षिक शुल्क असेल.
एलॉन मस्क आल्यानंतर ट्विटरमध्ये मोठे बदल झाले. अनेक कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला. तर भर मिटिंगमध्येच अनेक कर्मचाऱ्यांनी सामुहिक राजीनामा दिल्याने सर्वांनाच धक्का बसला. ऑक्टोबर महिन्यात मस्क यांनी ट्विटरच्या कार्यालयात पाऊल ठेवल्यानंतर ट्विटर गडबडले. भाडे थकल्याने आणि भाडे भरु शकत नसल्याने अनेक कार्यालये बंद करण्यात आली. कार्यालायतील खुर्च्या, टेबल आणि इतर वस्तूंचा ऑनलाईन लिलाव करण्याची नामुष्की ओढावली.
मस्क आल्यानंतर ट्विटरने ब्लू टिकसाठी वापरकर्त्यांकडून शुल्क वसूली सुरु केली. परंतु, या सेवेचा काही वापरकर्त्यांना अत्यंत दुरुपयोग केला. बनावट खाती उघडत त्यांनी अनेक कंपन्यांना गंडविले. त्यांच्या नावाचा गैरउपयोग करत त्यांचे नुकसान केले.
त्यानंतर ट्विटरने ही सेवा तात्काळ खंडित केली. खात्यातील या गडबडीमुळे ट्विटरची नाचक्की झाली. त्यांनी ही सेवा तात्काळ बंद केली होती. मस्कने ही सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला. मस्क येण्यापूर्वी 27 ऑक्टोबर रोजी ही सेवा पूर्णपणे मोफत होती. ब्लू टिक ही जागतिक नावाजलेल्या व्यक्ती, अभिनेता, अभिनेत्री, राजकीय नेते, पब्लिक फिगर, पत्रकार यांना व्हेरिफाईड केल्यानंतर देण्यात येत होती.
गेल्या वर्षी 13 एप्रिल रोजी एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदीची घोषणा केली होती. त्यानंतर मध्यंतरी पुलाखालून पाणी वाहून गेले. 26 ऑक्टोबर 2022 रोजी मस्क यांनी ट्विटरच्या कार्यालयात पाऊल ठेवले होते. त्यानंतरचा इतिहास सर्वांना माहितच आहे.