नवी दिल्ली | 7 जानेवारी 2024 : आगामी बजेटमध्ये मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देऊ शकते. मोदी सरकार कर्मचाऱ्यांच्या वेतनात घसघशीत वाढ करण्याची शक्यता आहे. कर्मचारी फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची मागणी करत आहेत. ही मागणी मान्य झाल्यास या अर्थसंकल्पात कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा होऊ शकते. फिटमेंट फॅक्टरच्या आधारावर कर्मचाऱ्यांना वेतन मिळते. फिटमेंट फॅक्टर वाढले तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार सुद्धा वाढेल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
बजेट असेल खास
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हे मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अंतरिम बजेट सादर करणार आहेत. अर्थात लोकसभा निवडणूक 2024 च्या तोंडावर मते इनकॅश करण्यासाठी त्याचा वापर होईल, हे सांगणे न लागे. निवडून आलेले सरकार पूर्ण बजेट सादर करेल. आतापर्यंत अंतरिम बजेटमध्ये मोठ्या तरतूदी करण्यात येत नव्हत्या. पण मोदी सरकारने हा पायंडा मोडला आणि नवीन योजनांची घोषणाच नाही तर त्यांची तरतूद पण केली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगार वाढीचा दिलासा मिळण्याची शक्यता वाटत आहे.
हा फिटमेंट फॅक्टर आहे तरी काय
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर हा 2.57 टक्के इतका आहे. याचा अर्थ एखाद्या कर्मचाऱ्याचे वेतन 4200 ग्रेड रुपये आहे तर त्यात मूळ वेतन 15,500 रुपये मिळेल. तर फिटमेंट फॅक्टरनुसार, त्याचे वेतन 15,500 X 2.57 म्हणजे 39,835 रुपये होईल. सहाव्या सीपीसीने फिटमेंट रेशो 1.86 करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तर कर्मचारी हा फिटमेंट फॅक्टर 3.68 करण्याची मागणी करत आहे. त्यामुळे त्यांचे किमान वेतन 18,000 रुपयांहून थेट 26,000 रुपये होईल. त्याचा जवळपास 48 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होईल.
बजेटमध्ये मिळेल गिफ्ट
अनेक केंद्रीय कर्मचाऱ्यांनी या बजेटमध्ये वेतन वाढ मिळण्यासाठी देव पाण्यात ठेवले आहे. हे अंतरिम बजेट आहे. यामध्ये मोठ्या घोषणा करण्यात येत नाही. पण मोदी सरकार निवडणुकीच्या तोंडावर काय निर्णय घेते हे 1 फेब्रुवारी रोजी समोर येईल. मोदी सरकार यावेळी मागणी पूर्ण करेल, असा विश्वास कर्मचाऱ्यांना आहे.