नवी दिल्ली | 22 ऑगस्ट 2023 : अमेरिकेसारखे प्रगत राष्ट्र जे करु शकले नाही, ते भारताने डिजिटल पेमेंटच्या (Digital Payment) माध्यमातून करुन दाखवले. युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात UPI, या भारतीय डिजिटल पेमेंट पद्धतीचा जगभरात डंका वाजला आहे. फ्रान्स, जर्मनी, अरब राष्ट्रापासून तर जपानपर्यंत अनेक देशांमध्ये युपीआयचा लवकरच डंका वाजेल. आता जर्मनीच्या डिजिटल मंत्र्यांना सुद्धा युपीआयची भुरळ पडली आहे. G-20 शिखर संमेलनासाठी जर्मनीचे केंद्रीय डिजिटल आणि वाहतूक मंत्री वोल्कर विस्सिंग (Volker Wissing) हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी बेंगळुरु शहरातील भाजीमार्केटमध्ये फेरफटका मारला. स्थानिक विक्रेत्यांकडून त्यांनी भाजी खरेदी केली. नगदी रोकड न देता त्यांनी डिजिटल पेमेंटचा (UPI Payment) वापर केला. जर्मनीच्या दुतावासाने ट्विटरवर याविषयीची एक पोस्ट शेअर केली आहे. त्यावर नेटकऱ्यांना कौतुकाचा वर्षाव केला आहे. मंत्री महोदयांनी भाजीपाला बाजारात घेतलेला हा अनुभव सध्या कौतुकाचा विषय ठरला आहे.
मंत्र्यांनी बाजारात केली खरेदी
जर्मनीचे मंत्री वोल्कर विस्सिंग यांनी बेंगळुरुच्या भाजीपाला बाजारात फेरफटका मारला. बाजारात आलेल्या भाजीपाल्याची माहिती घेतली. भारतात रस्त्यावरील किरकोळ भाजीपाला विक्रेत्याकडे युपीआय क्यूआर कोड पाहून ते थबकले. त्यांनी डिजिटल पेमेंटची माहिती घेतली. पेमेंट पद्धत कशी आहे, हे समजून घेतले.
त्यांनी एका दुकानदाराकडून भाजीपाला खरेदी केली. त्यांनी मोबाईल काढला. त्यातील डिजिटल पेमेंट एप उघडले. कोड स्कॅन केला आणि खरेदीची रक्कम दुकानदाराकडे मिळाल्याची खात्री केली. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सहज झाली. ही पद्धत सुरक्षित असल्याचे, आपला पैसा सुरक्षित हस्तांतरीत झाल्याची पुश्ती त्यांनी दिली. युपीआय पेमेंट पद्धतीचे कौतुक केले.
झटपट झाले पेमेंट
युपीआय हे भारतीय पेमेंट सिस्टम सध्या गेम चेंजर ठरले आहे. यामुळे लोकांना ऑनलाईन हस्तांतरीत करणे सोपे झाले आहे. सुरक्षित, झटपट पैसा हस्तांतरीत होत आहे. हे पेमेंट पद्धत 24X7 अशी उपयोगी पडते. अवघ्या काही सेकंदात रक्कम समोरच्या व्यक्तीच्या खात्यात जमा होते. एक रुपयांपासून तर काही हजार रुपयांपर्यंत झटपट पेमेंट हस्तांतरीत करण्यात येते.
One of India’s success story is digital infrastructure. UPI enables everybody to make transactions in seconds. Millions of Indians use it. Federal Minister for Digital and Transport @Wissing was able to experience the simplicity of UPI payments first hand and is very fascinated! pic.twitter.com/I57P8snF0C
— German Embassy India (@GermanyinIndia) August 20, 2023
युझर्सची तोबा गर्दी
सुरुवातीच्या काळात विरोधकांनी नाव ठेवले तरी युपीआय पेमेंट पद्धतीवर भारतीयांच्या उड्या पडल्या. आज गल्लीबोळात फिरणारे किरकोळ विक्रेते, पाईव्ह स्टार हॉटेल सर्वच ठिकाणी युपीआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. 500 दशलक्षांहून अधिक युझर्स युनिफाईड पेमेंट इंटरफेस, युपीआयचा वापर करत आहेत.
थर्ड पार्टीची नाही गरज
युपीआय प्लगइन सिस्टममुळे ऑनलाईन पेमेंटसाठी थर्ड पार्टी एप्सची गरज उरणार नाही. या नवीन फीचरमुळे ऑनलाईन पेमेंटसाठी व्हर्च्युअल पेमेंट एड्रेसचा वापर करता येईल. त्यामुळे सहज पेमेंट होईल. त्यासाठी थर्ड पार्टी एपची गरज नसेल.