नवी दिल्ली : दरवर्षी अनेक कर्मचारी चांगल्या पगारासाठी नोकरी बदलतात. कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) खाते असते. त्यात भविष्य निर्वाह निधी योजना (EPF) आणि कर्मचारी पेन्शन योजनेत (EPS) त्यांचा आणि कंपनीचा हिस्सा जमा होतो. त्यामुळे जुन्या ईपीएफच्या खात्यातून नवीन कंपनीत रुजू होताना ही रक्कम हस्तांतरीत करण्याचे लक्ष ठेवा. बऱ्याच कर्मचाऱ्यांना हे माहिती नसते की, त्यांना ईपीएफओकडून EPS प्रमाणपत्र (EPS Certificate) घ्यायचे असते.
ईपीएफ कायद्यानुसार, नोकरी सोडताना वा ईपीएफ योजनेतून बाहेर पडताना कर्मचाऱ्याने ईपीएस प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. परंतु, कर्मचारी या नियमाचे कसोशिने पालन करत नाहीत. ईपीएस प्रमाणपत्राचा वापर कशासाठी आवश्यक आहे, हे पाहणे आवश्यक आहे.
ईपीएस प्रमाणपत्रामुळे कर्मचाऱ्याचा त्या कंपनीतील कार्यकाळाची माहिती मिळते. त्याच्या सेवेचा कालावधी कळतो. त्याच्या सेवेचा तो रेकॉर्ड असतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी ईपीएस स्कीम सर्टिफिकेट मिळविणे आवश्यक असल्याचे मानण्यात येते.
जर एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी बदलली. नवीन ठिकाणी जॉब करताना, त्याला ईपीएफ स्कीमची सुविधा मिळाली नाही. तर त्याला जुन्या ईपीएफ खात्याशी संबंधित निवृत्ती योजनेचे प्रमाणपत्र मिळेल. निवृत्तीवरील दाव्यासाठी हे प्रमाणपत्र उपयोगी पडेल.
ईपीएस प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. घरबसल्याही तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळविता येते. यासाठी तुम्हाला ऑनलाईन प्रक्रिया करता येते. ईपीएफ सदस्य, अधिकृत पोर्टलवर जाऊन ईपीएस स्कीम सर्टिफिकेटसाठी अर्ज करु शकतो.