उद्योग विश्वातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व रतन टाटा हे काळाच्या पडद्या आड गेले. बुधवारी त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण भारत हळहळला. गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. रतन टाटा यांचा वारसदार म्हणून त्यांची निवड करण्यात आली. नोएल टाटा यांच्याकडे अगोदरच अनेक जबाबदाऱ्या आहेत. त्यांच्या निवडीबद्दल माजी सहकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. या पदासाठी योग्य व्यक्तीची निवड झाल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. टाटा ट्रस्टचे चेअरमन झाल्यावर त्यांनी रतन टाटा यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या.
रतन टाटाविषयी अशा व्यक्त केल्या भावना
नोएल टाटा यांच्या खांद्यावर टाटा ट्रस्टची जबाबदारी येऊन पडली आहे. अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर नोएल टाटा यांनी रतन टाटा यांच्याविषयीच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. आपण रतन टाटा आणि टाटा समूहाच्या संस्थापकांचा वारस पुढे नेण्यास उत्सुक असल्याचे ते म्हणाले. आपल्या सहकाऱ्यांनी आपल्याला या पदासाठी निवड केल्याने त्यांना आनंद व्यक्त केला. आपण विनम्र असल्याचे ते म्हणाले.
Tata Trust काय म्हणाले
टाटा ट्रस्टने नोएल टाटा यांच्या नियुक्तीबद्दल मत व्यक्त केले आहे. टाटा ट्रस्टच्या अनेक विश्वस्तांची मुंबईत एक संयुक्त बैठक झाली. त्यांनी रतन टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. टाटा समूहाच्या राष्ट्र निर्मितीतील योगदानाचे सर्वांनी स्मरण केले. रतन टाटा यांच्यानंतर नोएल टाटा यांची अध्यक्षपदावरील निवड ही सर्वानुमते करण्यात आल्याचे ट्रस्टने स्पष्ट केले.
टाटा ट्रस्टचे अध्यक्षपद इतके महत्त्वाचे का?
Tata Group जवळपास 34 लाख कोटी रुपयांचा आहे. या समूहातंर्गत सर्वाधिक कंपन्या टाटा सन्सकडे आहेत. तर टाटा सन्सची 66 टक्के हिस्सेदारी ही टाटा ट्रस्टकडे आहे. एक प्रकारे टाटा समूहाची मालकी टाटा ट्रस्टकडेच आहे हे अधोरेखित होते. टाटा समूह त्याच माध्यमातून व्यवस्थापन करतो. त्यामुळे नोएल टाटा यांच्याकडे या समूहाचे नेतृत्व येणे ही महत्त्वाची बाब मानण्यात येते.