नवी दिल्ली : भारताच्या शेअर बाजाराची (Share Market) क्रेझ पुन्हा दिसून आली आहे. माघार घेतलेले गुंतवणूकदार पुन्हा शेअर बाजाराकडे वळत आहेत. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी पुन्हा भारतीय बाजार जवळ केला आहे. पण गुंतवणूक करताना सावध राहिले नाही तर नवीन गुंतवणूकदारांची (Investors) फसगत होण्याची शक्यता आहे. कारण सध्या युट्युब, सोशल माध्यमांवर शेअर बाजार, गुंतवणुकीविषयी माहिती देणाऱ्या अनेक चॅनल्सचा सुळसुळाट आहे. त्यांचा सल्ला ऐकून तुम्ही पेन्नी स्टॉकमध्ये (Penny Stock) गुंतवणूक कराल, तर हे स्वस्तातील आमिष तुम्हाला महागात पडेल. त्यामुळे अभ्यासाशिवाय, स्टॉकची तांत्रिक माहिती असल्याशिवाय पेन्नी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे हे ‘आ बैल मुझे मार’ असे होईल.
झपाट्याने वाढला शेअर बाजार
चांगले गुंतवणूकदार व्हायचे असेल तर तुम्ही संशोधन सुरु ठेवा. शेअर बाजाराची बाराखडी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. जवळपास 9 वर्षांपूर्वी भारतीय शेअर बाजाराचा आकार आतापेक्षा तुलनेने जवळपास 3 पट कमी होता. BSE Sensex 31 मार्च 2014 रोजी 22,467.21 या उच्चांकावर बंद झाला होता. 6 जून रोजी बीएसई 62,602 अंकावर पोहचला आहे.
पेन्नी स्टॉकमध्ये खरंच फसवणूक ?
जास्तीत जास्त नवीन गुंतवणूकदार पेन्नी स्टॉकला पसंती देतात. 5 अथवा 10 रुपयांचा शेअर त्यांना खूप आकर्षक वाटतो. हा शेअर एकतर स्वस्त असतो. त्यामुळे गुंतवणूकदार त्यांची जमापुंजी याच शेअर्ससाठी खर्च करतात. पण जर वेळीच तुम्ही रिसर्च केला नाही. कंपनीला फटका बसला तर तुमच्या मेहनतीचा पैसा पाण्यात जाईल. या शेअर्समधून फायदा सोडा, नुकसानच नुकसान होईल. त्यामुळे पेन्नी स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.
या चूका टाळा
डोळे झाकून खरेदी नको
शेअर बाजार हा मोठा समूद्र आहे. याठिकाणी मोठा मासा, लहान मासोळ्यांची शिकार करतो. शेअर बाजारात तुम्ही दिवसागणिक काही ना काही शिकता. नवनवीन अनुभव गाठिशी जोडता. चुका केल्या, पैसा गेला तर ती एकप्रकारची गुरु दक्षिणाच असते. या छोट्या छोट्या चुकांतून तुम्ही शिकला तर काही वर्षात तुम्ही भूलथापांना बळी पडत नाहीत.