नवी दिल्ली : बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पंडितजी यांच्यात वाद पेटला आहे. सोशल मीडियावर तर ते सातत्याने चर्चेत राहत आहेत. बागेश्वर धाम सरकार (Bageshwar Dham Sarkar) मध्यप्रदेशात आहे. सध्या रायपूर येथे त्यांची रामकथा सुरु आहे. त्यांच्या दर्शनासाठी नेत्यांपासून लोकांची तोबा गर्दी होते. काही दिवसांपूर्वी नागपूर येथे आले असता, अंनिसने त्यांच्या अद्भूत शक्ती आणि रोग, समस्या, तसेच भूतप्रेत बाधा दूर करण्याच्या त्यांच्या दाव्याला विरोध केला होता. बाबा समाजात अंधश्रद्धा पसरवत असल्याचा दावा अंनिसने केला होता. पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krushna Shastri) यांनी अंनिस आणि इतर संस्थांचे, मीडियाचे दावे खोडण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांची बाजू जोरकसपणे मांडली. पण वाद शमलेला नाही. या वादविवादात काहींना त्यांची एकूण संपत्ती (Networth) किती आहे, असा प्रश्न पडला आहे.
बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कुटुंबियांची परिस्थिती अत्यंत हालाकिची होती. एक वेळ अशी होती की घरात कधी कधी जेवणाची भ्रांत पडत असे. एक कच्चे-पक्के घर राहण्यासाठी होते. पावसाळ्यात हे घर गळत असे.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा जन्म 4 जुलै 1996 रोजी मध्यप्रदेशातील छत्तरपूरजवळील गडागंज गावात झाला. त्यांचे संपूर्ण कुटुंब या गडागंजमध्येच राहते. याठिकाी प्राचीन बागेश्वर धामचे मंदिर आहे. त्यांचे आजोबा पंडित भगवान दास गर्ग (सेतु लाल) हे पण याच गावात राहतात.
धीरेंद्र शास्त्री यांचे सोशल मीडियावर शकडो व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यात ते भक्ताच्या मनातील गोष्ट ओळखण्याचा दावा करतात. तोबा गर्दीतील एखाद्या भक्ताच्या नावाचा पुकारा करतात आणि त्याच्या मनातील ठळक गोष्टी, समस्या, मुद्दे एका कागदावर लिहितात. व्यक्तीला उपाय सांगतात.
सनातन धर्मात ध्यान-चिंतनाला अत्यंत महत्व आहे. या आभासी शक्तीच्या माध्यमातूनच भक्तांच्या अंतःर्मनातील चलबिचल, त्याच्या समस्या ओळखता येत असल्याचा पंडितजींचा दावा आहे. हनुमानाच्या कृपेने हे कार्य होत असल्याचे ते सांगतात. याविषयीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तसेच त्यांच्या या अलौकिक शक्तींवर अनेकांना आक्षेप घेतला आहे.
झी न्यूजच्या बातमीनुसार, शास्त्रीजी दर महिन्याला जवळपास 3.5 लाख रुपये कमाई करतात. दररोज ते जवळपास 8 हजार रुपये कमाई करत असल्याचा दावा करण्यात येत आहे. बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर अंधविश्वास पसरविण्याचा आरोप करण्यात येत आहे.
त्यांच्याविरोधात महाराष्ट्रात अंनिसने शड्डू ठोकले आहे. पंडितजींच्या विरोधात नागपूरमध्ये अंनिसने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी वेळीच योग्य कारवाई नाही केली तर कोर्टात दाद मागण्याचा इशारा अंनिसने दिला आहे.