मुंबई : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. भारतातील तर ते नंबरवनचे श्रीमंत व्यक्ती आहेत. गडगंज संपत्ती असलेले मुकेश अंबानी तितकेच विनम्र आहेत. मनमिळावू आहेत आणि उदारही आहेत. नुकताच त्यांनी त्यांच्या ऑफिसमधील एका कर्मचाऱ्याला दीड हजार कोटीचा फ्लॅट खरेदी करून दिला. त्यामुळे ते चर्चेत आलेच. पण असंही अंबानी कुटुंब कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतंच. मुकेश अंबानी असो, नीता अंबानी असो किंवा आकाश, अनंत आणि ईशा… अंबानी कुटुंबातील (ambani family) प्रत्येक सदस्य हा नेहमी चर्चेत असतोच. अंबानी यांचा असाच एक किस्सा सध्या व्हायरल होत आहे. त्यांनी चक्क मुलालाच वॉचमनची माफी मागायला लावली असल्याचा हा किस्सा आहे.
निता अंबानींचा खुलासा
नीता अंबानी यांनीच एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. एकदा आकाश अंबानी हे वॉचमनवर प्रचंड रागावले होते. त्यांनी रागाच्या भरात सर्वांसमोर या चौकीदाराला फटकारले होते. त्यामुळे चौकीदारही घाबरून गेला होता. आकाश यांच्या या वर्तनाची माहिती मुकेश अंबानी यांना कळली. तेव्हा ते प्रचंड नाराज झाले. त्यांनी लगेच त्या वॉचमनची माफी मागण्यास आकाश यांना सांगितलं. आकाश यांनीही वडिलांचं ऐकून त्या वॉचमनची माफी मागितली होती.
चॅट शोमध्ये खुलासा
नीता अंबानी या सिमी ग्रेवाल यांच्या चॅटशोमध्ये गेल्या होत्या. यावेळी त्यांनी आपल्या खासगी आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टींचा उलगडा केला होता. त्यावेळी त्यांनी हा खुलासा केला. एकदा आकाश वॉचमनवर भडकला होता. तो त्या वॉचमनशी तावातावाने बोलत होता. मुकेश यांनी ते पाहिलं. त्यांनी आकाशला फटकारलं आणि सुरक्षा रक्षकाची माफी मागायला सांगितली. त्यानंतर आकाने वडिलांच्या सांगण्यावरून सुरक्षा रक्षकाची माफी मागितली, असं नीता अंबानी यांनी सांगितलं होतं.
पैसे झाडाला लागत नाही
या शोमध्ये नीता अंबानी यांनी अनेक खुलासे केले होते. पैसा आणि पॉवर एकत्र चालत नाही. सत्तेची दलाली केली जाऊ शकत नाही. माझ्यासाठी शक्ती ही जबाबदारी आहे. माझं कुटुंब, माझं काम यासाठी मी माझ्या शक्तीचा जबाबदारीचा वापर करते. हे सर्व मी माझ्या मिडल क्लास व्हॅल्यूपासून घेतलंय. मुकेश अंबानी जमिनीवर पाय ठेवून वागणारे व्यक्ती आहेत. त्यांची मुलं चांगली माणसं व्हावीत असं त्यांना वाटतं. मुलांनी पैशाची किंमत समजावी. पैसा झाडाला लागत नाही. धन कमावण्यासाठी मेहनत करावी लागते, असं ते नेहमी सांगतात, असं नीता यांनी या मुलाखतीत सांगितलं होतं.
अंबानी आहेस की भिकारी
यावेळी नीता यांनी एक किस्साही सांगितला होता. माझी मुलं लहान होती. तेव्हा शाळेच्या कँटिनमध्ये खर्च करण्यासाठी मी त्यांना प्रत्येक शुक्रवारी पाच रुपये द्यायची. एके दिवशी अनंत माझ्या बेडरूममध्ये आला. त्याने मला दहा रुपये मागितले. त्यावर मी त्याला दहा रुपये कशाल हवेत? असं विचारलं. तेव्हा तो म्हणाला की, आता वर्गातील मुलंही मला खिशातून पाच रुपयाचं नाणं काढून दाखवतात आणि म्हणतात, अंबानी आहेस की भिकारी? नीता यांनी हा किस्सा सांगताच मुकेश अंबानी यांनाही हसू आवरता आलं नाही.