नामवंत उद्योगपती मुकेश हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांची तिन्ही मुलं आकाश, ईशा आणि अनंत हे तिघे वडिलांना व्यवसायात मदत करत असून रिलायन्सचा कारभार समर्थपणे सांभाळतात. सध्या मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत बराच चर्चेत असून त्याचं लवकरच राधिका मर्चंटसोबत लग्न होणार आहे. मार्च महिन्यात गुजरातच्या जामनगरमध्ये त्यांचं प्री-वेडिंग फंक्श पार पडलं. त्यासाठी केवळ बॉलिवूडचे कलाकारच नव्हे तर देश विदेशातील सेलिब्रिटी, गायक, राजकारणी, उद्योगपती यांनी हजेरी लावली. बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग यांसारखे बडे असामीदेखील अनंत राधिकाला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले.
येत्या जुलैमध्ये अनंत राधिकाचं लग्न होणार असून त्यांच्या लग्नाबद्दल नव्या डिटेल्स समोर आल्या आहे. त्यांचं लग्न हा एक ग्लोबल इव्हेंट बनला आहे. मुकेश अंबानी यांच्या धाकट्या लेकाचं, अनंत अंबानी याचं लग्न परदेशात पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.मुकेश अंबानी यांची जगाच्या अनेक भागात घरे आहेत. यात दुबई ते अमेरिकेचा समावेश आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी त्यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनसाठी जामनगरची निवड केली होती. जुलै महिन्यात त्यांचं लग्न होणार असून रिपोर्ट्सनुसार ते लंडनमध्ये सप्तपदी घेणार आहेत. त्यांच्या लग्नासाठी जगभरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
592 कोटींच्या प्रॉपर्टीमध्ये होणार लग्न
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न बरोब्बर तीन महिन्यांनी जुलैमध्ये लंडनमधील ‘स्टोक्स पार्क इस्टेट’मध्ये होणार आहे. मुकेश अंबानी यांनी 2021 मध्ये ही मालमत्ता खरेदी केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी आपला बहुतांश वेळ भारताबाहेर घालवतात. या घरात अंबानी कुटुंबाने 15 ऑगस्टचे सेलिब्रेशन केले होते. आज या घराची किंमत 592 कोटी रुपये आहे.
काय आहे खास ?
हे मुख्य लंडनपासून सुमारे 40 किमी अंतरावर आहे. चहुबाजूने झाडं आणि हिरवळ असलेलं हे घर सुमारे 300 एकरमध्ये पसरलं आहे. यात 49 आलिशान खोल्या आहेत. तसेच 3 उत्तम रेस्टॉरंट आहेत. या व्हिलामध्ये 4000 स्क्वेअर फूटचे जिम आणि फिटनेस सेंटर आहे. तिथे एक इनडोअर स्विमिंग पूल आहे. यात टेनिस कोर्ट आणि 27-होल गोल्फ कोर्स देखील आहे. हे एकेकाळी ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ II चे घरही होते. त्याचबरोबर जेम्स बाँड सिरीजचे चित्रपटही यात शूट करण्यात आले आहेत.
अनंतसाठी दुबईत विकत घेतलं घर
मुकेश अंबानी यांनी दुबईच्या प्रसिद्ध ‘पाम जुमेराह’मध्येही एक प्रॉपर्टी खरेदी केली आहे. हा एक व्हिला आहे, ज्याचा स्वतःचा खाजगी बीच आहे. त्यांनी हा करार 2021 मध्येच केला होता. या घराची किंमत (अंदाजे) 666 कोटी रुपये असल्याचे सांगितलं जात आहे. हे घर त्यांनी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीसाठीच खरेदी केल्याची चर्चा आहे.