नवी दिल्ली : गेल्या वर्षी फेब्रुवारीत रशियाने युक्रेनवर हल्ला (Russia Ukraine War) चढवला. त्यामुळे अमेरिकेसह पश्चिमी राष्ट्रांनी रशियावर आर्थिक प्रतिबंध घातले. रशियाला या आर्थिक प्रतिबंधाचा सामना करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या कच्चा तेलाचे भाव (Crude Oil Price) कमी करुन रशियाने त्याची निर्यात वाढवली. स्वस्तात कच्चे तेल मिळत असल्याने अनेक देशांनी रशियाकडून तेल आयात वाढवली. 2021 मध्ये भारताच्या कच्चा तेलाच्या आयातीत रशियाचा वाटा अवघा 1 टक्के होता. परंतु, कच्चा तेलाचे भाव घटवल्याने भारतीय तेल कंपन्यांनी (OMCs) रशियाकडून सर्वाधिक तेल आयात केले आहे. भारतीय तेल कंपन्यांना त्याचा फायदा झाला आहे. पण जनतेच्या पदरात काय पडले, हा संशोधनाचा विषय आहे.
भारत पण रशियाकडून स्वस्तात कच्चा तेलाची खरेदी करत आहे. द इकोनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, भारत रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल खरेदी करत आहे. एका वृत्तानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रशियातील नायरा एनर्जी यांनी आयातीत 45 टक्के वाटा मिळवला आहे. युक्रेन युद्धानंतर हा वाटा वाढला आहे. या दोन्ही कंपन्यांची यामुळे चंगळ होत आहे. स्वस्तात कच्चे तेल मिळवून, त्यावर प्रक्रिया करत, ते इतरांना विक्री करण्यात या दोन्ही कंपन्यांना फायदा होत आहे.
घरगुती रिफाइनिंग कॅपासिटीबाबत विचार करता, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि नायरा एनर्जी यांच्यातील वाटा 35 टक्क्यांच्या जवळपास आहे. एनर्जी कार्गो ट्रॅकर वोर्टेक्साने याविषयीची आकडेवारी दिली आहे. त्यानुसार, गेल्या वर्षी मार्चपासून ते यावर्षी फेब्रुवारी या 12 महिन्यापर्यंत भारताने रशियाकडून दररोज 8.7 बॅरल क्रूड ऑईल आयात केले आहे.
भारत कच्चा तेलासाठी जगातील अनेक देशांवर अवलंबून आहे. पण भारताची एकट्या रशियकडून होणाऱ्या कच्चा तेलाच्या आयातीत वाटा वाढला आहे. 2021 मध्ये भारताच्या कच्चा तेलाच्या आयातीत रशियाचा वाटा अवघा 1 टक्के होता. परंतु, कच्चा तेलाचे भाव घटवल्याने भारतीय तेल कंपन्यांनी रशियाकडून सर्वाधिक तेल आयात केले आहे.
रशिया-युक्रेन युद्ध भडकले, त्यावेळी फेब्रुवारी 2022 मध्ये रशियातून एक टक्क्यांहून कमी तेल आयात करण्यात येत होती. या फेब्रुवारी महिन्यात 35 टक्के वाढ झाली आहे. 16.20 लाख बॅरल प्रति दिन तेल आयात करण्यात येत आहे. रशियाकडून तेल आयात होत असल्याने सौदी अरब आणि अमेरिकेच्या आयातीवर त्याचा थेट परिणाम होत आहे. सौदी अरबच्या तेल आयातीत 16 टक्के घट तर अमेरिकेकडून होणाऱ्या तेल आयातीत 38 टक्क्यांची घट आली आहे.
भारत यापूर्वी इराक आणि सौदी अरबकडून मोठ्या प्रमाणात तेल आयात करत होता. पण रशियाकडून तेल आयातीत नवीन रेकॉर्ड तयार झाला आहे. या दोन्ही देशांकडून भारताने इतक्या वर्षात तेलाची जी आयात केली, त्यापेक्षा रशियाकडून अधिक प्रमाणात तेल आयात करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात इराककडून 9,39,921 बॅरल प्रतिदिवस, सौदी अरबकडून 6,47,813 बॅरल प्रतिदिवस तेल आयात करण्यात आली. तर संयुक्त अरब अमिरातकडून 4,4570 बॅरल प्रतिदिवस तेलाची निर्यात करण्यात आली. तर अमेरिकेकडून भारताने प्रति दिवस 2,48,430 बॅरलची आयात केली आहे.