घाईक महागाचा (WPI Inflation) कहर झाला आहे. नवीन आकड्यांनी अनेकांचे डोळे पांढरे झाले आहेत. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात महागाईचे योगदान मोठे आहे. गेल्या 15 महिन्यात पहिल्यांदाच महागाईने मोठी झेप घेतली. त्याचा थेट परिणाम आता किरकोळ बाजारात दिसेल. महागाई आधारेच आरबीआय ईएमआयचे गणित ठरवते. मे महिन्यात घाऊक महागाई दर 2.61 टक्के होता. एप्रिल महिन्यात हाच दर 1.26 टक्के होता. म्हणजे महागाई दर दुप्पट झाला आहे.
महागाड्या भाजीपाल्याने गणित बिघडवलं
सर्वसामान्यांच्या खिशावर महागाईने डाका टाकला. त्यात महागड्या भाज्यांनी महत्वाची भूमिका निभावली. बटाटे, कांदा, टोमॅटो, लसूण आणि इतर भाज्यांच्या किंमती भडकल्या. या भाज्यांच्या घाऊक किंमतीत मोठी वाढ दिसली. भाजीपाल्याचा महागाई दर मे महिन्यात 32.42% होता. एप्रिल महिन्यात हा आकडा 23.60 टक्के होता. तर काद्याचा महागाई दर मे महिन्यात 58.05 टक्के आणि बटाटे, आलूचा महागाई दर 64.05 टक्के होता.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने शुक्रवारी WPI महागाईचे मे महिन्यातील आकडे सादर केले. यामध्ये खाद्यवस्तूंची महागाई पण समोर आली. आकड्यांनुसार, मे महिन्यातील खाद्यवस्तूंचा महागाई दर 9.82 टक्के तर एप्रिल महिन्यातील हा दर 7.74 टक्के होता. तर महागाईत सर्वाधिक तेल ओतण्याचे काम डाळींनी केले आहे. डाळींचा महागाई दर मे महिन्यात 21.95 टक्के होता.
इंधनापासून ते वीजेपर्यंत सर्वच महाग
मे महिन्यात इंधनापासून ते वीजेपर्यंत सर्वच महागले. मे महिन्यात इंधन आणि वीज क्षेत्रातील महागाईचा दर 1.35 टक्के होता. याशिवाय उत्पादीत मालाच्या क्षेत्रात महागाई दर 0.78 टक्के होता. पण घाऊक महागाईच्या आकड्यांपेक्षा किरकोळ महागाईचे आकडे वेगळे आहेत. मे महिन्यात किरकोळ महागाई दर 4.75 टक्क्यांवर आला आहे. हा दर गेल्या वर्षभरातील सर्वात निच्चांकी स्तरावर आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची पतधोरण समिती रेपो दर ठरविताना या किरकोळ महागाई दरावर लक्ष ठेवून असते. पण घाऊक महागाईच्या आकड्यांनी सरकारचे टेन्शन वाढवले आहे. कारण या आकडेवारीचा परिणाम किरकोळ महागाईवर पण दिसतो.